मुंबई : मुंबई महापालिकेतील पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या मोठ्या नालेसफाई घोटाळ्यातील तब्बल ३२ कंत्राटकामांत आणि रस्ते दुरुस्ती कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाला. याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर निलंबित करण्यात आलेले पालिकेच्या दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांना सक्तीने निवृत्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी पालिकेच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आला असून प्रस्ताव संमत झाल्यानंतर मुरुडकरना तीन महिन्यांची नोटीस देऊन सक्तीने सेवानिवृत्त करण्यात येणार आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी निलंबित झालेल्या दक्षता विभागाच्या प्रमुखाला सक्तीने निवृत्त करण्याची पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
३० जानेवारी १९६२ रोजी जन्मलेल्या मुरुडकरनी २९ जानेवारी १७ रोजी वयाची ५५ वर्षे पूर्ण केली आहेत. मुरुडकर १ एप्रिल २०१३ पासून दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता आहेत. मोठ्या नालेसफाईच्या ३२ कंत्राटकामांच्या आणि रस्ते दुरुस्ती प्रकरणातील अनियमिततेबाबत मुरुडकरना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १९ सप्टेंबर २०१५ पासून निलंबित केले आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यांची सचोटी संदिग्ध आहे आणि त्यांची नैतिक अधोगती झाल्याचे दिसून येते, असा शेरा प्रशासनाने मारला आहे. यामुळे त्यांना वयाच्या ५५ वर्षांपुढे सेवासातत्य न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुरुडकरना तीन महिन्यांची लेखी नोेटीस देऊन सक्तीने निवृत्त करण्याची शिफारस पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने स्थायी समितीला केली आहे.
No comments:
Post a Comment