फेरीवाल्यांकडील ९६ टक्के बर्फ नमुने खाण्यास अयोग्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 April 2017

फेरीवाल्यांकडील ९६ टक्के बर्फ नमुने खाण्यास अयोग्य

मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने पालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांमधील खाद्यपदार्थ व पेयपदार्थ विकणारे फ्रूट ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, बर्फाचे गोळेवाले, लस्सी व ताक विक्रेते, फास्ट फूड सेंटर्स इत्यादी फेरीवाल्यांकडील बर्फ नमुने; तसेच उपहारगृहातील बर्फाच्या नमुन्यांची चाचणी केली त्यामध्ये ९६ टक्के बर्फ नमुने हे खाण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. तर याच नमुन्यांपैकी ७५ टक्के नमुन्यांमध्ये 'इ-कोलाय' जीवाणू आढळून आले आहेत. याशिवाय फेरीवाल्यांकडील १० टक्के पाणी नमुन्यांमध्येही 'इ-कोलाय' जीवाणू आढळून आले आहेत. सामान्यपणे मानवी विष्ठेमध्ये 'इ-कोलाय' हे जीवाणू आढळून येतात. या जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे गॅस्ट्रो (अतिसार), जुलाब, कॉलरा, कावीळ, विषमज्वर यासारखे जलजन्य आजार होऊ शकतात त्यामुळे खाद्यपदार्थ व पेय पदार्थ विकणा-या फेरीवाल्यांकडील पाणी पिणे, बर्फ मिश्रीत पेय पिणे; तसेच खाद्यपदार्थ खाणे नागरिकांनी टाळावे असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे.


जलजन्य आजारांना प्रतिबंध व्हावा यासाठी खाद्यपदार्थ व पेय पदार्थ विकणा-या फेरीवाल्यांकडील बर्फ व पाणी नमुन्यांची चाचणी करण्याची मोहिम अधिक व्यापक करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. यानुसार बर्फ व पाणी नमुने यांची तपासणी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात येत आहे. १ ते २५ एप्रिल या कालावधीत पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील खाद्यपदार्थ व पेयपदार्थ विक्रेत्यांकडील बर्फ व पाणी नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या चाचणी दरम्यान पालिकेच्या २४ पैकी १४ विभागातील सर्व १०० टक्के बर्फ नमुने हे खाण्यास वा पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.त्याचबरोबर पालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये सरासरी ७५ टक्के बर्फ नमुन्यांमध्ये इ-कोलाय जीवाणू आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे गोवंडी, देवनार इत्यादी परिसरांचा समावेश असणा-या 'एम पूर्व' या विभागात आढळून आले आहे. या विभागातील सर्वच्या सर्व १०० टक्के बर्फ नमुन्यांमध्ये इ-कोलाय जीवाणू आढळून आले आहेत. खाद्य व पेय पदार्थ विकणा-या फेरीवाल्यांकडील बर्फ हा 'आईस फॅक्टरी' मध्ये तयार होत असल्याने त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाच्या 'अन्न व औषध प्रशासन खात्या'ला कळविण्यात आले आहे, अशीही माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. केसकर यांनी दिली आहे.

खाद्य व पेय पदार्थ विकणा-या फेरीवाल्यांकडील पाणी नमून्यांमध्ये देखील `इ-कोलाय' बाधित नमुने मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.पालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांमध्ये सरासरी २७ टक्के पाणी नमुने हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचे; तर सरासरी १० टक्के पाणी नमुने हे इ-कोलाय बाधीत असल्याचे आढळून आले आहे.पालिका क्षेत्रातील बर्फ व पाणी नमून्यांमध्ये आढळून आलेले इ-कोलाय जीवणूंचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नये, बाहेरील पाणी - सरबत – उसाचा / फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे, तसेच पाणीपुरी - भेळपुरी सारखे पदार्थ खाणेही टाळावे असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जेवणापूर्वी व अन्न शिजवताना, तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत; घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या - फळे स्वच्छ धुऊन खावेत, तसेच वैयक्तिक स्वच्छता काटेकोरपणे राखण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मळमळ, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.

Post Bottom Ad