मुंबई महापालिका एसडब्लूडी विभाग घोटाळा = भाग ८ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 April 2017

मुंबई महापालिका एसडब्लूडी विभाग घोटाळा = भाग ८


रफी नगर नाल्यातील माती आणि कचऱ्याची नाले सफाई कंत्राटदारांना गाळ म्हणून विक्री -
मुंबईतील गाळ म्हणून मुंबईबाहेर जातेय रफी नगर नाल्यातील माती -
एसडब्लूडी अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने आणखी एक नाले सफाई घोटाळा -

मुंबई / अजेयकुमार जाधव -
मुंबई महानगरपालिकेत नाले सफाई व रस्ते घोटाळा झाला. या घोटाळ्यामधून मुंबई महानगरपालिकेने काही शिकून पुन्हा असे घोटाळे होणार नाहीत यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. परंतू असे प्रयत्न झाले नसल्याचे उघड झाले आहे. मुंबईत नाले सफाईचे काम करणारे कंत्राटदार गोवंडीच्या रफी नगर नाल्यामधील माती येथील आर. ई. इन्फ्रा कंत्राटदाराकडून विकत घेऊन नाले सफाई सुरु असल्याचे भासवत आहेत. मुंबईबाहेर नाले सफाईचा गाळ जात नसून रफी नगर नाल्यातील माती गाळ म्हणून मुंबई बाहेर जात असल्याने पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नव्याने सुरु असलेल्या नाले सफाई घोटाळ्याची वेळीच नोंद घेऊन चौकशी करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते जाहिद शेख यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या एसडब्लूडी (पर्जन्य जल वाहिन्या) विभागाकडून सन २०१४ मध्ये १६८ व १८२ या निविदेमधून रफी नगर, बैंगणवाडी, बाप हेरिटेज, ज्ञानसाधना हायस्कुल नाल्याच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कंत्राट आर. ई. इन्फ्रा.ला देण्यात आले. या नाल्यावर अनेक झोपड्या होत्या, या झोपड्या अधिकृत अनधिकृत करण्यात पालिका अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ असल्याने झोपड्या हटवण्यात येत नव्हत्या. याच दरम्यान नाल्याचे काम करण्यासाठी नाल्याचे पाणी अडवणे गरजेचे होते. यासाठी मुंबईमध्ये सुरु असलेल्या बिल्डरच्या कामाच्या ठिकाणचा मातीचा कचऱ्याच्या व रॅबिटच्या जवळपास १०७०० ट्रिप गाड्या रफी नगर नाल्यात आणून टाकण्यात आल्या.

मुंबईत पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले जाते. या कामादरम्यान नाल्यातील गाळ काढून मुंबईबाहेर टाकण्यात येतो. रफी नगर नाल्याच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कंत्राट दिले आहे. नाल्यावरील झोपड्या नुकत्याच हटवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी असलेली माती व इतर साहित्य आर. ई. इन्फ्रा. या कंत्राटदाराने हटवणे हे कंत्राटदाराचे काम आहे. मात्र आर. ई. इन्फ्रा. या कंत्राटदाराकडून मुंबईमधील इतर ठिकाणच्या नाले सफाई करणाऱ्या कंत्राटदारांना एका गाडीसाठी २३०० रुपये या दराने नाल्यातील माती व इतर कचरा विकला जात असल्याचे आरटीआय कार्यकर्ते जाहिद शेख यांनी सांगितले.

रफी नगर नाल्यातील माती व कचरा आर. ई. इन्फ्रा या कंत्राटदाराला निविदेच्या अटी व शर्ती प्रमाणे साफ करणे गरजेचे असताना हा कचरा मुंबईमधील नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांना खुलेआम विकला जात आहे. रफी नगर नाल्यातील कचरा व माती मुंबईतील इतर कंत्राटदार ते काम करत असलेल्या नाल्यातील गाळ म्हणून मुंबई बाहेर नेवून टाकत असल्याचे भासवत आहेत. आर.ई. इन्फ्रा.व मुंबईमधील नाले सफाई करणारे कंत्राटदार स्वतःचा करोडोचा फायदा करत असून मुंबई महानगरपालिकेची फसवणूक करत आहेत. मुंबई महानगर पालिकेची जी फसवणूक केली जात आहे त्यात कंत्राटदाराबरोबर पालिकेचे अधिकारीही गुंतले असल्याने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी जाहिद शेख यांनी केली आहे.

रफी नगर नाल्यावर सीसीटीव्ही लावा -
गोवंडी बैंगणवाडी रफी नगर ते घाटकोपर छेडा नगर नाल्यावर संरक्षण भिंत बांधणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. हा भ्रष्टाचार आरटीआय मधून उपलब्ध झालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाला आहे. या भ्रष्टाचाराबरोबर या ठिकाणी आता नाले सफाईचा कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात माती व नाल्यातील कचरा विकून आणखी मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नाल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी जाहिद शेख यांनी केली आहे.

Post Bottom Ad