मुंबई – मालाड 'पी उत्तर' विभागाद्वारे मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान मनोरी गावातील दोन अनधिकृत बंगले तोडण्यात आले तर दोन बंगल्यांची प्राथमिक अवस्थेतील बांधकामे देखील उध्वस्त करण्यात आली आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त डॉ.संगीता हसनाळे यांनी दिली आहे. त्याचबरोबर ईनासवाडी परिसरात अनधिकृतपणे बांधलेल्या ३ खोल्या व तलावराठोडी गावात एक अनधिकृत गाळा देखील तोडण्यात आला आहे. 'पी उत्तर' विभागातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सुरु असलेली धडक कारवाई यापुढेही सुरुच राहील, असेही डॉ. हसनाळे यांनी सांगितले ही कारवाई उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली
पालिकेच्या परिमंडळ - ४ मधील 'पी उत्तर' विभागात प्रामुख्याने मालाड, दिंडोशी, मढ इत्यादी परिसरांचा समावेश होतो. 'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' यांच्या अखत्यारित असणारे 'मनोरी' हे गाव मार्च २०१७ पासून पूर्णपणे पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यानंतर या गावातील विविध अनधिकृत बांधकामांवर पालिकेद्वारे धडक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी मनोरी गावामध्ये करण्यात आलेल्या कारवाईसाठी पालिकेचे २४ कामगार – कर्मचारी - अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलाच्या कर्मचा-यांचे सहकार्य पालिकेला लाभले होते. त्याचबरोबर या कारवाईसाठी २ जेसीबीसह इतर आवश्यक यंत्रसामुग्रीदेखील वापरण्यात आली. मनोरी हे गाव नव्यानेच पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेले असल्याने या गावात बांधकामे करताना पाळावयाचे नियम, पालिकेच्या संबंधित परवानगी प्रक्रियांची माहिती व नियमांचे अनुपालन याबाबत नागरिकांना माहिती होण्याच्या दृष्टीने मनोरी गावामध्ये जनजागृतीपर व्याख्यानांचेही आयोजन केले जात आहे, अशीही माहिती डॉ. हसनाळे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment