मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई शहराची प्लानिंग ऑथॉरिटी म्हणून मुंबई पालिका काम करत आहे. परंतु मिठागराच्या जमीनीवर विकास योजना राबविण्यासाठी मिठागर आयुक्तांची परवानगी मिळत नाही. पालिका आयुक्तांना ते जुमानत नाही. आयुक्तांच्या अधिकारावर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप भाजपने केला. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप करणार आहे.
मुंबई पालिकेने पाणी पुरवठा, मलनिःसारण, पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते आदी विकास योजनांसाठी मिठागर आयुक्तांकडे जागेची मागणी करूनही त्यांना पालिकेला मिठागराची जमीन दिली जात नाही. केळकर महाविद्यालयासमोरील रस्ता, मिठागर ते लिंक रोड असा रस्ता तयार झाला तर मुलुंडमधील वाहतूक कोंडी फुटलेल्या पूर्व भागातून पूर्व द्रूतगती महामार्गावरून आत येताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे नागरिकांचा वेळ आणि इंधन वाचेल, आर्थिक बचत आणि प्रदुषणाच्या विळख्यातून पर्यावरणाचे रक्षणही होईल. विकास आराखड्यातील हा अडीच किलोमीटरचा रस्ता गेल्या सात वर्षांपासून रखडला आहे.
या रस्त्यासाठी मिठागर आयुक्तांकडून जमीन मिळत नाही. केळकर महाविद्यालयाच्या समोरून मिठागराच्या जमीनीवरून जाणारा रस्ता मिठागर आयुक्तांनी उखडून टाकला आहे. त्यामुळे ही दादागिरी सहन करू नये, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केली. मिठागराच्या जमीनीवर पायाभूत सुविधांसाठी पालिकेकडून परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे मिठागराच्या जमीनीवरील अशा सुविधांवर पालिकेने कारवाई का करू नये असा सवालही त्यांनी केला आहे. पालिका आयुक्तांनी ही समस्या सोडवावी अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. आयुक्तांनी यावर तोडगा न काढल्यास मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारशी पाठपुरावा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मिठागर आयुक्तांचे पालिकेच्या अधिकाऱ्यावर होत असलेले अतिक्रमण रोखण्याची मागणी त्यांनी केली आहे .त्यामुळे मिठागर आयुक्त आणि पालिका आयुक्त यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.