मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेत शिवसेना पक्षाची सत्ता आहे मात्र शिवसेना नगरसेवकांमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ असा मोठ्या प्रमाणात वाद रंगला आहे या वादाचा फटका पालिका अभियंत्याचा गुणगौरव करण्याच्या प्रस्तावाला बसला. त्यामुळे हा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत दप्तरी दाखल करण्यात आला. दरम्यान नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळे पालिकेतील गुणवंत अभियंते गुणगौरवापासून वंचित राहिल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
शिवसेनेच्या तत्कालीन ज्येष्ठ नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर ज्येष्ठ नगरसेविका राजुल पटेल यांनी अनुमोदन दिले. तर या प्रस्तावावर खासदार व तत्कालीन नगरसेविक राहुल शेवाळे यांनी केलेल्या उपसूचनेवर ज्येष्ठ सदस्य मंगेश सातमकर यांनी अनुमोदन दिले. मात्र शिवसेनेच्या नवनियुक्त सदस्यांनी या प्रस्तावास विरोध केल्याने तो दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय विधी समिती अध्यक्ष अडॅ. सुहास वाडकर यांना घ्यावा लागला. पालिकेतील कनिष्ठ अभियंता ते प्रमुख अभियंता यांच्या कामाची गुणवत्ता लक्षात घेऊन शासनाच्या धर्तीवर पालिकेचे सन्मान चिन्ह व महापौर पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा ठराव सन २००८ रोजी डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी मांडला होता. त्याच धर्तीवर पालिका आयुक्तांकडून पालिकेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्याना सन्मानित केले जाते. मात्र, पालिकेच्या अभियंत्यांचा गुणगौरव करण्यास शिवसेनेतील नगरसेवकांमधील फुटीरता समोर आली आहे. वरिष्ठ व कनिष्ठ असे दोन गट पालिकेत तयार झाल्याने हा प्रस्ताव रोखण्यात आल्याचे मनसेचे दिलीप लांडे यांनी सांगितले. तसेच प्रस्तावावर मतदान न घेता तो परस्पर दफ्तरी दाखल करण्यामागे कोणते राजकारण सुरु आहे, याचा खुलासाही करण्याची मागणी केली.
No comments:
Post a Comment