रफी नगर नाल्यावरील झोपड्यावर कारवाईमुळे भ्रष्टाचाराचे प्रकरण खरे असल्याचे सिद्ध -
"जेपीएन न्यूज"च्या बातमीला महापालिकेचाच दुजोरा -मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिकेच्या एसडब्लूडी (पर्जन्य जल वाहिन्या) विभागाकडून सन २०१४ मध्ये १६८ व १८२ या निविदेमधून देण्यात आलेल्या रफी नगर, बैंगणवाडी, बाप हेरिटेज, ज्ञानसाधना हायस्कुल नाल्याच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कंत्राट २०१४ मध्ये आर. ई. इन्फ्रा. या कंत्राटदाराला देण्यात आले. या निविदेमधील अटी शर्ती भंग करणे. कागदपत्रांची पूर्तता न करणे, बँक ग्यारेंटीची रक्कम न भरणे, काम झाले नसताना कंत्राटदाराला निधी देणे हे प्रकार "जेपीएन न्यूज" मधून प्रसिद्ध करण्यात आले. आपले इतर प्रकार उघड होऊ नये म्हणून कंत्राटदार आणि महानगरपालिकेने घाईगडबडीत गुरुवारी २० एप्रिल रोजी रफी नगर नाल्यावरील काही झोपड्या तोडून टाकल्या आहेत. महापालिकेने झोपड्या तोडल्याचे प्रसिद्ध पत्रक काढून जाहीर केल्याने "जेपीएन न्यूज"ने उघड केलेले भ्रष्टाचाराचे प्रकरण खरे असल्याचे सिद्ध झाले आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त अजोय मेहता यांच्या माध्यम सल्लागार कार्यालयाने दिनांक २१ एप्रिल २०१७ रोजी वार्तापत्र प्रसिद्ध केला आहे. या वार्तापत्रात बृहन्मुंबई महापालिकेच्या 'एम पूर्व' विभागात गोवंडीतील रफी नगर नाल्याच्या पात्रात झोपड्यांची अतिक्रमणे उद्भवल्याने सदर ठिकाणी नाल्याच्या रूंदीकरणाचे काम गेली ८ वर्षे प्रलंबित होते. या ठिकाणी असणा-या ७७ झोपड्या महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आल्याने आता या ठिकाणी नाल्याच्या रूंदीकरणास वेग येणार आहे, अशी माहिती 'एम पूर्व' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली असल्याचे म्हटले आहे.
गोवंडीतील शिवाजीनगर मध्ये दुर्गा सेवा संघाजवळील भागात रफी नगर नाला आहे. या नाल्याच्या पात्रात दोन्ही बाजूला अतिक्रमण स्वरुपातील ७७ झोपड्या उभ्या राहिल्या होत्या. या झोपडयांमुळे या परिसरातील नाल्याच्या रुंदीकरणाचे काम गेली ८ वर्षे प्रलंबित होते. महापालिकेच्या परिमंडळ – ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान 'एम पूर्व' विभागाद्वारे या झोपड्यांची पात्रता निश्चित करण्यात येऊन या झोपड्या नुकत्याच करण्यात आलेल्या एका कारवाई दरम्यान हटविण्यात आल्याचे पत्रकारांना कळविण्यात आले आहे.
या कारवाईमुळे नाल्याच्या रुंदीकरणाच्या कामांना गती प्राप्त होणार आहे.ज्यामुळे पावसाळयाच्या कालावधीत या परिसरातील अहिल्याबाई होळकर मार्ग, ९० फूटी मार्ग व शिवाजीनगर बेस्ट बस डेपो आदी परिसरात पाण्याचा निचरा अधिक वेगाने होण्यास मदत होऊन वाहतूक सुरळीत होण्यास देखील मदत होणार आहे. ही कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे ४६ पोलीस कर्मचारी व महापालिकेचे २५ कामगार – कर्मचारी -अधिकारी कार्यरत होते. तसेच या कारवाईसाठी ३ जेसीबी व २ डंपर देखील वापरण्यात आले, अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.
खुद्द महापालिकेनेच रफी नगर नाल्याचा विकास ८ वर्षे रखडल्याचे आणि या ठिकाणच्या झोपड्या महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आल्याने आता या ठिकाणी नाल्याच्या रूंदीकरणास वेग येणार असल्याचे म्हटले आहे. वास्तविक पाहता या झोपड्या इतके वर्षे या नाल्यावर उभ्या का होत्या ? या ठकाणी सॉईल टेस्टिंग, नाला रुंदीकरण, नाल्याचे खोलीकरण, नाला वळविणे यासारखी कामे या झोपड्या न हटवता कशी सुरु होती ? इतके वर्षे पालिकेने कंत्राटदाराला कोणत्या कामाचे पैसे दिले या सर्व प्रकरणाची पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते जाहिद शेख यांनी केली आहे.
इतर झोपड्याच्या सुरक्षेचा प्रश्न -
मुंबई महानगरपालिकेकडून अनेक वेळा अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाते. अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना किंवा अधिकृत तसेच जे बांधकाम तोडायचे नाही त्याला कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही याची दखल घेतली जाते. रफीनगर नाल्यावरील झोपड्या तोडताना जेसीबीचा वापर करण्यात आला. अनधिकृत झोपड्यावर कारवाई करताना इतर झोपड्याना याचे हादरे बसल्याने इतर झोपड्यां पडण्याची शक्यता असून यामधील राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जाहिद शेख - आरटीआय कार्यकर्ते
No comments:
Post a Comment