माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावी जनजागृती करावी - पंकजा मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2017

माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावी जनजागृती करावी - पंकजा मुंडे


मुंबई, दि. 21 : मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ तसेच अत्याचारग्रस्त महिलांना मदत मिळावी यासाठी मनोधैर्य या योजनेचे नूतनीकरण करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज दिली. या योजनांसंदर्भात अनुभव व सूचना येत्या दोन दिवसात लेखी स्वरूपात पाठवाव्यात अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. मुंडे यांनी माझी कन्या भाग्यश्री व मनोधैर्य या योजनांसंदर्भात राज्यभरातील अधिकाऱ्यांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होत्या.
मुलीला वारस म्हणून स्वीकारा - मुंडे म्हणाल्या की, स्त्री भ्रूण हत्या पूर्णपणे थांबावी, मुलींचा जन्मदर वाढावा, मुलगा - मुलगी यात भेद नको ही संकल्पना रूजविण्यासाठी व प्रथम तसेच व्दितीय कन्याजन्माचे स्वागत म्हणून माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत लाभ दिला जातो. तसेच ज्या ग्रामपंचायती अंतर्गत मुलींचा जन्मदर‍ मुलांपेक्षा अधिक असेल अशा ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येतो. योजना राबविताना अडचणी येत असतील, शासन निर्णयात काही अडचणी वाटत असतील तर तात्काळ मार्गदर्शन मागवावे, शासन निर्णयाचे सखोल वाचन करा, माझी कन्या भाग्यश्री योजनेत केवळ लाभार्थी वाढविणे हे उद्दिष्ट नाही तर मुलीला वारस म्हणून स्वीकारावे, तशी मानसिकता निर्माण व्हावी हे आपले उद्दिष्ट आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एलआयसीसोबत बैठक घेण्यात येईल तसेच अधिकारी, कर्मचारी यांची कार्यशाळा आयोजित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मनोधैर्य योजनेसाठी सूचना - मनोधैर्य योजनेचे नूतनीकरण करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाईल त्या पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांचे अनुभव व सूचना येत्या दोन दिवसात ई-मेलवर पाठवाव्यात अशा सूचना मुंडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. योजनेंतर्गत गंभीर प्रकरणांमध्ये तत्काळ मदत मिळावी यासाठी योग्य कार्यवाही तत्काळ व्हावी असेही त्यांनी सांगितले. आमिष दाखवून अत्याचारानंतर अनेक प्रकरणात अत्याचार पीडित व अत्याचार करणारा नंतर एकत्र लग्न करून राहत असल्यास अशा प्रकरणांसाठी शासन निर्णयात दखल घेतली जाईल, असेही मुंडे यांनी सांगितले.

ग्रामसभेत शासन निर्णयाचे वाचन करा - माझी कन्या भाग्यश्री योजने संदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयात काही मुद्यांमुळे स्थानिक पातळीवर योजना राबविण्यात अडचणी येत असून शासन निर्णयात अधिक सुस्पष्टता आणण्यासाठी तात्काळ शुध्दीपत्रक काढण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये शासन निर्णयाचे वाचन व्हावे व योजनेसंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात बॅनर लावण्यात यावे, योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रभावी जनजागृती करावी,अशा सूचनाही मुंडे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad