मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईमधील राजकीय नेत्यांकड़े पालिकेचे ७० उद्यानांचे भूखंड, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे(खेळाची मैदाने) आणि उद्यानांचे भूखंड (आरजी/पीजी) आहेत. हे भूखंड राजकीय नेत्यांकडून पालिकेने तातडीने आपल्या ताब्यात घेऊन ते सामान्य नागरिकांसाठी विकसित करुन मुंबईकरांना खुले करुन द्यावेत. अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरापूर्वी खाजगी संस्थांना देखभालीसाठी दिलेली खेळाची मैदाने, उद्याने आणि मनोरंजन मैदाने (आरजी/पीजी) पालिकेने ताब्यात घेण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने ही उद्याने, मनोरंजन मैदाने आणि खेळाची मैदाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सध्या राजकीय नेत्यांच्या ताब्यात असलेल्या उद्याने आणि मैदानांवर संबंधित नेत्यांची अलिशान क्लब उभारले असून, त्यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. यामध्ये एकूण १२० ते १३० भूखंड पालिकेने ताब्यात घेतले असून, उर्वरित ६० ते ७० भूभाग हे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व खाजगी संस्थांकडून पालिकेने घेतलेले नाहीत, याकडे राजा यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
ताब्यात घ्यावयाच्या भागातून राजकीय नेत्यांकडे मोक्याच्या ठिकाणी असलेले भूखंड वगळणे हे अत्यंत संतापजनक असून करदात्या मुंबईकरांवर अन्याय करणारे आहे. पालिकेची उद्याने, मैदाने खाजगी संस्थांना दत्तक तत्वावर देण्याचे धोरण गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. सामान्य नागरिकांना मैदानात प्रवेश देण्याची अट धोरणात असली तरी, अनेक संस्था नागरिकांना प्रवेश नाकारत असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच प्रशासनाचे महसूली उत्पन्न कमी होत असून सामान्य नागरिकांना मोकळा श्वास मिळणेही दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, असेही रवी राजा यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.