मुंबई - गुन्ह्याचा आलेख वाढत असलेल्या सायबर क्राइमला प्रतिबंधासाठी मुंबई पोलीस दलात आता सायबर सेलच्या चार नवीन सेलची निर्मिती करण्यात येणार आहे. माहिती व तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या कक्षासाठी नव्याने अद्ययावत तंत्रसामग्री तसेच सहायक आयुक्तांपासून ते कॉन्स्टेबल दर्जापर्यंतची पोलिसांच्या विविध संवर्गातील १८६ पदे बनविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी १०० जणांच्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या सायबर हल्ल्यांमुळे पूर्ण जगात भीतीचे सावट निर्माण झाले. त्यामुळे त्याबाबत जागरूक राहण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पोलीस आयुक्तांनी पाठविलेल्या या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी १४ कोटी ५९ लाख ५६ हजार ७२० रुपये खर्च अपेक्षित आहे. गृह विभागाकडून त्याला नुकतीच मान्यतादेखील मिळाली आहे. येत्या काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने ते कार्यान्वित केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ होत आहे. त्यात आॅनलाइन आर्थिक गैरव्यवहार, सोशल मीडियाद्वारे अश्लीलता पसरविणे आणि अन्य फसवणुकीच्या घटना घडत आहेत. या घटनांना प्रतिबंधासाठी सायबर विभागामध्ये चार आणखी सायबर सेल सुरू करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडून पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला गृहविभागाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.