मुंबई - दाऊद फोन प्रकरणी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करणारी भारतीय जनता पार्टी, दाऊदच्या जवळच्या नातलगाच्या लग्नात जाणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कोणती कारवाई करणार, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. गिरीश महाजन यांची मंत्रीमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली.
गिरीश महाजन नाशिकला कुविख्यात दाऊदचे जवळचे नातलग शहर काजी यांच्या घरच्या लग्नात हजर होते. त्यांच्याबरोबर भाजपाचे काही आमदारही त्या लग्नात जेवण करत आहेत, अशी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. या लग्नात हजर राहिलेल्या काही पोलीस अधिकार्यांची गुप्तवार्ता विभागाने, आयबीने (इन्टलिजन्स ब्युरो) चौकशी सुरू केली आहे. या पोलीस अधिकार्यांचा दाऊदशी संबंध तपासला जात आहे. तोच न्याय महाजन यांनाही लावला पाहिजे. त्यांचीही आयबीने चौकशी केली पाहिजे असेही सावंत म्हणाले.
गिरीश महाजन यांचे व दाऊदचे नेमके काय संबंध आहेत? दाऊदच्या कोणत्या धंद्यात त्यांचा सहभाग आहे, या सर्व बाबी तपासल्या गेल्या पाहिजेत. हे सरकार क्लीन चिट सरकार आहे, त्यामुळे महाजन यांची चौकशी दाबली जाईल, अशी भीतीही सावंत यांनी व्यक्त केली. दाऊदचे नेमके जळगावशी काय कनेक्शन आहे? दाऊदच्या पत्नीशी खडसे यांच्या व्यक्तीगत मोबाईलवरून फोन केले गेले असा आरोप झाला होता. खडसे यांच्यावर केलेल्या कारवाईत याही आरोपाचा संबंध होता. विधानसभेत आता खडसे यांच्या बाजूच्या जागेवर महाजन यांना बसवा, अशी मागणीही सावंत यांनी केली.