सामाजिक न्याय विभागाचे शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 May 2017

सामाजिक न्याय विभागाचे शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार जाहीर


मुंबई, दि. 22 : राज्यात विविध क्षेत्रात काम करून वंचितांच्या न्यायासाठी झटणाऱ्या संस्थांच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने राज्यातील सहा संस्थांना शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार जाहीर केले आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या 125 व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम 24 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापुरमधील केशवराव भोसले नाट्यगृहात होणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिली.

बडोले म्हणाले की, निवड समितीने शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कारासाठी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, रत्नागिरी, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे, केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव, शिवप्रभू बहुउद्देशिय क्रीडा शिक्षण सांस्कृतिक मंडळ बुलढाणा, लॉर्ड बुध्दा मैत्रिय संघ, नागपूर, आणि सावित्रीबाई, फुले महिला एकात्म समाज संचालित डॉ. हेगडेवार रूग्णालय, गारखेडा औरंगाबाद अशा सहा संस्थांची निवड केली आहे. या संस्थांना 15 लाख रूपये आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कारासाठी निवड केलेल्या 125 व्यक्तींपैकी मुंबईतून 21, पुणे जिल्ह्यातून 13, नागपूर जिल्ह्यातून 12, नाशिक जिल्ह्यातून सात, भंडारा सहा, नाशिक आणि अमरावती, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यातून प्रत्येकी पाच, जालना आणि धुळे जिल्ह्यातून प्रत्येकी चार, अहमदनगर,वाशिम, औरंगाबाद, ठाणे आणि सातारा जिल्ह्यातून प्रत्येकी तीन, अकोला,जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली आणि रत्नागिरी जिल्ह्यातून प्रत्येकी दोन, सांगली, सोलापूर,कोल्हापूर, लातूर, नांदेड आणि जिल्ह्यातून प्रत्येकी दोन, पालघर, सिंधुदूर्ग, रायगड, गडचिरोली, वर्धा,बीड आणि बुलढाण्यातून प्रत्येकी एक अशा एकूण 125 व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 25 हजार रूपये, शाल,खण आणि श्रीफळ देऊन पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.

सामाजिक जाणिवेने वंचितांच्या हितासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे शासनाचे धोरण आहे. सामजिक कार्यासाठी युवकांनी अधिकाधिक पुढाकार घ्यावा आणि शासनाच्या समाजाभिमुख उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहनही श्री. बडोले यांनी केले.

Post Bottom Ad