मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईतील रस्ते व नाल्यांची कामे ठरलेल्या वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी येत्या मंगळवारी 9 व गुरुवारी 11 मे रोजी पालिकेच्या सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त यांनी कार्यालयात न थांबता आणि कोणत्याही कार्यालयीन बैठकांना हजर न राहता पूर्णवेळ त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व नाल्यांच्या कामांची पाहणी करावी आणि ही कामे ठरलेल्या वेळेत व गुणवत्तापूर्णरित्या करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी.रस्ते व नाल्यांच्या कामांना मोहिमेचे स्वरुप यावे, यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी या दोन दिवसांनंतर देखील सातत्याने या बाबींचा आढावा घेऊन सदर कामे वेळेत व गुणवत्तापूर्णरित्या करवून घ्यावी असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी आढावा बैठकीत दिले.
पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात पालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख यांच्यासह पालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते यावेळी आयुक्त अजोय मेहता यांनी आदेश दिले पालिका क्षेत्रात सुरु असलेली रस्त्यांची कामे ही प्रामुख्याने 'प्रकल्प रस्ते, 'प्राधान्यक्रम रस्ते' या दोन प्रकारात विभागण्यात आली असून यापैकी प्रकल्प रस्त्यांच्या कामे ही निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्णरित्या करवून घेण्याची जबाबदारी ही प्रमुख अभियंता यांची आहे. तर प्राधान्यक्रम १ व २ अंतर्गत असणा-या रस्त्यांबाबत हेच दायित्व संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर सोपवण्यात आले आहे गेल्यावर्षीप्रमाणेच या वर्षीदेखील पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१३ ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप बसविण्यात येत असून याबाबत गेल्यावर्षी निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतींनुसार सर्व संबंधित सहाय्यक आयुक्तांनी स्वतः जाऊन या पंपांची चाचणी करावी असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत
मुंबईत अतिसाराचे 916 रुग्ण -एप्रिल २०१७ मध्ये पालिका क्षेत्रात अतिसाराचे ९१६ रुग्ण आढळून आले आहेत.पालिकेच्या काही विभागांच्या क्षेत्रात ही संख्या तुलनेने अधिक आहे यामध्ये प्रामुख्याने 'एल' (२०७ रुग्ण), 'एम पूर्व' (९७ रुग्ण), 'एन' (९२ रुग्ण), 'पी उत्तर' (७९ रुग्ण), 'एच पूर्व' (७० रुग्ण), 'एम पश्चिम' (६४ रुग्ण), 'आर उत्तर' (४८ रुग्ण), 'एच पश्चिम' (३४ रुग्ण) या विभागांचा समावेश आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी व बर्फ दूषित असल्याचेही आढळून आले आहेत, अशी माहिती पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी आजच्या बैठकी दरम्यान दिली. या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रातील पेय पदार्थ व खाद्य पदार्थ विकणा-या अनधिकृत विक्रेत्यांविरोधातील सध्या सुरु असलेली मोहिम अधिक तीव्र करावी, असे निर्देश बैठकी दरम्यान देण्यात आले.
जनजागृतीपर फलक -मुंबई पालिका क्षेत्रातील अनेक विभागात डी, एस, एल, एम पश्चिम, पी उत्तर आदि दरडी कोसळण्याची शक्यता असणारी ठिकाणे असून या ठिकाणी ठळकपणे दिसतील व अधिक काळ टिकतील, असे जनजागृतीपर फलक लावण्याचे आदेश बैठकी दरम्यान देण्यात आले.
कंत्राटदाराना त्वरित खडी उपलब्ध करून दया -मुंबईच्या रस्त्यांच्या कामांच्या बाबतीत कंत्राटदारांना काही ठिकाणी खडीची मोठ्या प्रमाणात चणचण भासत आहे मूळात निविदेनुसार खडीची जबाबदारी ही पूर्णत: संबंधित कंत्राटदारांची असून संबंधित कंत्राटदारांच्या खर्च व जबाबदारीवर प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांनी खडीसाठी तातडीची निविदा काढावी व ज्या कंत्राटदारांना आवश्यकता असेल त्यांना यानुसार खडी उपलब्ध करुन द्यावी असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.