मुंबई, दि. 6 : मुंबईतील 'एल्फिन्स्टन रोड' रेल्वे स्थानकाचे नाव'प्रभादेवी' रेल्वे स्थानक असे करण्यास तर 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' रेल्वे स्थानकाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' असे करण्यास केंद्र शासनाच्या गृहविभागाने मान्यता असल्याचे कळविले आहे. राज्य शासनाने या दोन्ही स्थानकांची सुधारीत नावे इंग्रजी व देवनागरी लिपीत राजपत्रात प्रसिद्ध करुन त्याप्रमाणे नावांमध्ये बदल करावेत, असे केंद्रीय गृहविभागाने कळविले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षापासून यासाठी आपण करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.
या दोन्ही स्थानकांच्या नावामध्ये बदल व्हावेत ही समस्त मुंबईकरांची तसेच राज्यातील जनतेची भावना होती. यासाठी आपण मागील कित्येक वर्षापासून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत होतो. राज्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्य शासन व केंद्र शासनाकडे आपण हा विषय लावून धरला होता.‘एल्फिन्स्टन रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’ असे करण्याबाबत आपण १९९१ पासून प्रयत्न करीत होतो. अखेर साधारण २६ वर्षाच्या या पाठपुराव्यास यश आले असून आता ‘एल्फिन्स्टन रोड’सह छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या नामबदलास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील प्रकिया पूर्ण करुन या दोन्ही स्थानकांच्या नावामध्ये तातडीने बदल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.