मुंबई, दि. 18 : वानखेडे स्टेडियममध्ये दि. 16 मे 2017 रोजी झालेल्या इंडियन प्रिमिअर लिग (आयपीएल) क्रिकेट सामन्याच्या वेळी आवेष्टित (पॅकबंद) वस्तूंची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या तीन विक्रेत्यांविरुद्ध वैधमापन शास्त्र यंत्रणेने खटले दाखल केले आहेत.
आयपीएल क्रिकेट सामन्याच्यावेळी स्टेडियमध्ये पॅकबंद वस्तूंची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश वैध मापन यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांना दिले होते. त्या नंतर दि. 16 मे 2017 रोजी वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या क्रिकेट सामन्याच्या वेळी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी विशेष तपासणी केली. त्यामध्ये मे. दानापाणी, गरवारे पॅव्हेलियन यांनी छापील 75 रुपये किमतीची मॅग्नम कँडी आईस्क्रिमची विक्री 100 रुपयास विकत असल्याचे तसेच गावस्कर स्टँडवरील स्टॉल क्र.3चे प्रतिनिधी शेख रजा आर व विजय मर्चंट स्टँडमधील स्टॉल क्र.1 वरील रफीक शेख यांनी छापील 55 रुपयांचे कोरनॅटो आइस्क्रिम 60 रुपयास विकत असल्याचे आढळून आले. जास्त दराने वस्तूची विक्री करुन ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी या तीनही विक्रेत्यांविरुद्ध वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व त्या अंतर्गत आवेष्टित वस्तू नियमातील तरतुदीनुसार खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच स्टेडियममध्ये जास्त दराने विक्री करून ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी काय केले याबाबतचा बीसीसीआयला विचारणा करण्यात आली असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.
राज्यातील कोणत्याही स्टेडियममध्ये आवेष्टित वस्तू विक्रेत्यांकडून फसवणूक होत असल्याचे निर्दशनास आल्यास ग्राहकांनी तातडीने वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. (022-22886666) किंवा ई-मेल dclmms@yahoo.in किंवा dclmms_complaints@yahoo.com, dyclmmumbai@yahoo.in, dyclmkokan@yahoo.in, dyclmnashik@yahoo.com, dyclmpune@yahoo.in, dyclmaurangabad@yahoo.in, dyclmamravati@yahoo.in, dyclmnagpur@yahoo.in या ईमेलवर तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन गुप्ता यांनी पत्रकाद्वारे केले आहे.