मुंबई - देशातील कष्टकर्या, शेतकर्यांचीही अवस्था दयनीय आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी कष्टकरी व शेतकर्यांच्या प्रगतीसाठी कृषी व औद्योगिक धोरण राबवले. हे धोरण श्रमिकांना दिलासा देणारे होते. हे धोरण प्रभावीपणे राबवले गेले असते तर आज चित्र वेगळे दिसले असते. आता राज्यकर्त्यांनी या धोरणाचा पुनर्विचार करावा, असे ठाम मत ज्येष्ठ विचारवंत माजी मंत्री भाई वैद्य यांनी येथे व्यक्त केले.
कामगार नेते कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावरील गुलाबपुष्प या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा दादरच्या स्वातंत्र्यवीर सभागृहात रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने वैद्य बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कामगार नेते कॉ. गुलाबराव गणाचार्य हे श्रमिकांच्या उत्कर्षासाठी लढले. त्यांनी आपले आयुष्य संघर्षात घालवले. त्यामुळेच आज आपण कामगारांच्या हक्कांबाबत बोलत आहोत. कामगार संघटना का संपल्या, चळवळी का क्षीण झाल्या याचा विचार होणे गरजेचे आहे. अर्थव्यवस्था समजावून घेऊन ती श्रमिक वर्गाला समजावून सांगण्याची गरज असल्याचे वैद्य यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आपले विचार व्यक्त करताना कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या कार्याचा गौरव केला.
कॉ. डॉ. भारत पाटणकर यांनी कामगार चळवळीचा इतिहास सांगून कॉ. गुलाबराव गणाचार्य यांनी कामगारांसाठी जीवन जगून दाखवले ते खर्या अर्थाने समतावादी होते, कारण त्यांच्या आडनावातच गणाचार्य आहे, असे म्हणून त्यांनी भगवान गौतम बुद्धांचा इतिहास विषद केला. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या चित्राताई वाघ यांनी कामगार नेते गणाचार्य यांच्या कार्याचा गौरव केला आणि अशा नेत्याचा इतिहास तरुण पिढीला समजला पाहिजे, असे मत व्यक्त केले. रशियन कौन्सिलेटचे डॅनिएल नसबुद्दीन यांनी आपल्या भाषणात गणाचार्य यांचा इतिहास जागवला.
कॉ. भालचंद्र कानगो यांनी आपल्या भाषणात बुद्धी आणि श्रम यांना समान तराजूत जोखले पाहिजे. मात्र, बुद्धिजीवी वर्गाला विशेष वागणूक आणि श्रमिकांना कमी लेखले जाते ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले. खा. हुसेन दलवाई यांनी कामगार चळवळ संपत असल्याची खंत व्यक्त केली. त्यानंतर आमदार मंगेश कुडाळकर यांचे भाषण झाले. दरम्यान, तत्पूर्वी लोकशहिरांचा कार्यक्रम झाला. गुलाबपुष्प या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक अनिल गणाचार्य यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील गणाचार्य यांनी केले.