मुंबई जागतिक दर्जाचे शहर. आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी. २४ तास जागे असलेले शहर, २४ तास कामानिमित्त लोकांची धावपळ या शहरात पहायला मिळते. अश्या या शहरातील नागरिकांना सोयी सुविधा देण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महानगरपालिका करत आहे. याच मुंबई महापालिकेतून मुंबई शहरात ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामधून लक्ष ठेवले जाते. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम याच महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून केले जाते.
अश्या सोयी सुविधा आणि उच्च टेक्नॉलॉजीनी सुसज्ज असलेल्या महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा भेटी देऊन मुंबईमध्ये निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीची पाहणी केली आहे. याच आपत्कालीन व्यवस्थापन विभागातून मुंबईमधील अनेक घटनांबाबत पोलीस, अग्निशमन दल, नेव्ही इत्यादी यंत्रणांना माहिती पुरवून आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागात अनेक नव्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे.
असे असताना याच आपत्कालीन व्यवस्थापन विभागात भूत असल्याची बातमी काही वर्तमान पत्रांमधून व वृत्त वाहिनीवरून प्रसिद्ध झाली आहे. २००५ साली मुंबई मध्ये झालेल्या जल प्रलयानंतर हा आपत्कालीन विभाग सुरु करण्यात आला. हा विभाग आधी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर सुरु करण्यात आला. नुकताच हा विभाग मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर सुसुज्ज अश्या जागेत सुरु करण्यात आला. याचे उदघाटन खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले होते.
असा हा आपत्कालीन विभाग नव्या जागेत सुरु झाल्यावर मोठ्या आगी लागण्याचे कॉल्स मोठ्या प्रमाणात येवू लागले. त्यानंतर रात्रीच्यावेळी कर्मचाऱ्यांना आठ कर्मचारी असतानाही नऊ कर्मचारी दिसणे, काचांचा आवाज, चालण्याचा आवाज असे विचित्र भास व्हायला लागले. या ठिकाणी भूत असून त्याची वाट याच कार्यालयाच्या जागेतून जात असल्याने रात्रीच्यावेळी येथे काम करणे कर्मचाऱ्यांना कठीण होत होते. परंतु वास्तूशांती आणि पूजा केल्यानंतर हे प्रकार काही प्रमाणात कमी झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
मुंबई महापालिकेत अश्या अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. जुन्या इमारतीमध्ये एका कर्मचाऱ्याने व एका महिलेने आत्महत्या केल्याने या लोकांची भुते या ठिकाणी फिरतात असेही सांगितले जाते. सध्या याच इमारतीमध्ये मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचे कार्यालय आहे. काही वर्षापूर्वी याठिकाणी महापालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष देण्यात आला होता. बातम्या करण्यासाठी अनेक पत्रकार रात्री या ठिकाणी काम करत असताना आंबवजा येण्याचा भास झाला आहे. नंतर हा आवाजाचा भास झाडांच्या पानाचा व घुबडाचा असल्याचे उघड झाले आहे.
काही महिन्यापूर्वी नव्या इमारतीमध्ये कँटिंग मधील मुलाला रात्री भूत दिसले आणि त्याला भुताने झपाटल्याची चर्चा सुरु होती. या मुलाची माहिती काढल्यावर त्याला शासकीय रुग्णालयात मानसिक उपचार दिल्यावर हा मुलगा चांगला असून या उपचारानंतर पुन्हा असा प्रकार घडला नसल्याची माहिती समोर आली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागात कर्मचाऱ्यांना असे काही प्रकार जाणवत असल्यास त्यांच्यावर असलेल्या कामाच्या ताणामुळे असे प्रकार होऊ शकतात. अश्या कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ चांगले कसे राहील याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
कर्मचाऱ्यांना भुताची भीती वाटत असल्यास ती भींती घालवण्यासाठी आणि विचित्र आवाज येत असल्यास हे आवाज कसले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हेवे होते. असे न करता सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेल्या व संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवून असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयात वास्तुशांती आणि पूजा घातली गेल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याने या विभागाची व मुंबई महानगरपालिकेबाबत उलट सुलट चर्चा होत आहे.
महापालिका मुख्यालयाच्या दोन्ही इमारतींची तीन पाळ्यांमध्ये सुरक्षा राखली जाते. तिन्ही पाळयांमध्ये याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात असतात. महापालिकेत भूत असते तर सर्वात आधी रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या या सुरक्षा रक्षकांना त्रास दिला असता. हे सुरक्षा रक्षक रात्री अपरात्री जुन्या इमारतींच्या दोन्ही माळ्यावर व नव्या इमारतींच्या सहाही माळ्यावर रात्रीच्या वेळेस येऊन जाऊन असतात. या कर्मचाऱ्यांना कधीही कोणतेही भूत दिसलेले नाही. मात्र ज्या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशिवाय कोणी येऊ जाऊ शकत नाही अश्या ठिकाणी भुतांचा भास होत असेल तर यापेक्षा हास्यास्पद अशी घटना नाही.
मुंबई शहर ज्या राज्यात आहे त्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे. हा कायदा बनवला त्या विधानभवनापासून मुंबई महानगरपालिका जवळ आहे. अश्या ठिकाणी या कायद्याला धाब्यावर बसवून भुते घालवण्यासाठी, विचित्र आवाज येतात म्हणून पूजा घातली जात असेल आणि वास्तूशांती करण्यात आली असेल आणि त्यानंतर असे प्रकार कमी झाले असे म्हटले जात असेल तर याचा विचार राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचे मुख्य असलेले पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी करायला हवा.
जगातील अनेक देश मंगळावर जाण्याची तयारी करत असताना जागतिक दर्जाच्या मुंबई शहरातील महानगरपालिकेच्या मुख्यालयात अंधश्रद्धेचे असे प्रकार घडत असतील तर आपण जगाच्या किती पाठी आहोत याचा विचार करायला हवा. मुख्यालयात भुतांची भीती वाटते म्हणून आणि विचित्र आवाज येतात म्हणून पूजा आणि वास्तुशांती केली गेली असेल तर असे प्रकार करताना पालिकेचे मुख्य असलेले आयुक्त अजोय मेहता काय करत होते ? त्यांनी असे प्रकार वेळीच का रोखले नाहीत ? अजोय मेहता यांचाही या अंधश्रद्धेला पाठिंबा होता का ? याचा खुलासा आयुक्तांनी करायला हवा. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या प्रमाणे याप्रकरणी महापालिकेने आणि राज्य सरकारने काय कारवाई करणार याचा खुलासाही व्हायला हवा.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३