घाटकोपर परिसरात तिघांवर कोल्ह्याचा हल्ला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 May 2017

घाटकोपर परिसरात तिघांवर कोल्ह्याचा हल्ला


मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील महापालिकेच्या पम्पिंग स्टेशन परिसरात १२ तासांत तिघांवर कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात तिघांच्याही हाताला जखमा झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोल्ह्याच्या दहशतीमुळे या परिसरात काम करणार्‍या सुरक्षा रक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सोमवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर पम्पिंग स्टेशन हाऊसचे सुरक्षा रक्षक चेतन पाटील हे ड्युटीवर तैनात असताना ४ फूट उंच उडी मारून काळय़ा रंगाच्या कोल्ह्याने त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पाटील यांनी दुसर्‍या हाताने कोल्ह्याच्या गळय़ाला पकडून त्याला बाजूला ढकलले. तरीदेखील कोल्ह्याने माघार न घेता पाटील यांचा पाठलाग करत त्याने त्याच्या दाताने पाटील यांची पॅण्ट पकडली. त्या वेळी पाटील यांनी आरडाओरडा करून त्यांच्या सहकार्‍यांना बोलावले असता कोल्ह्याने तेथून धूम ठोकली. अशाच प्रकारे राकेश शुक्ला या गोदरेज कंपनीच्या खाजगी सुरक्षा रक्षकालाही कोल्ह्याने आपले टार्गेट केले. त्यांच्यादेखील हाताला जखम झाली असून सर्व्हिस रोडवरून जाणार्‍यावरही याच कोल्ह्याने हल्ला चढवल्याचे प्रत्यक्षदश्रींकडून सांगण्यात आले. या हल्ल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकांनी पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्यानुसार पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी शुक्ला यांना प्रथम राजावाडी व नंतर जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post Bottom Ad