
मुंबई / प्रतिनिधी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाची आघाडी किंवा एेक्य करण्याचे आवाहन केले आहे. समाजातील सर्व घटकांना एकसंघ रिपब्लिकन पक्ष हवा आहे. आठवले यांच्या आवाहनाचे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खरात) स्वागत करीत आहे. रिपब्लिकन ऐक्य हवे असल्यास आधी आठवले यांनी भाजपाशी असलेली युती तोडावी आणि नंतर रिपब्लिकन एेक्याची भाषा करावी असे आवाहन रिपाई (खरात) चे अध्यक्ष सचिन खरात यांनी केले आहे.
रिपब्लिकन पक्षाची निर्मिती शोषितांना न्याय मिळवून देणे व धर्मांध, जातीयवादी , प्रांतवादी व मनुवादी पक्षाना विरोध करण्यासाठी झालेली आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देउन काहीही करून सत्ता हस्तगत करणे हे रिपब्लिकन पक्षाचे ध्येय नाही. रिपब्लिकन पक्ष व इतर पक्षात विचारांचा फरक आहे असे खरात यांनी म्हटले आहे. भाजप हा जहाल हिंदूत्ववादी इतर धर्माचा तिरस्कार करणारा पक्ष आहे. भाजपला धर्म निरपेक्षतेचे काहीही देणे घेणे नाही. रिपब्लिकन पक्षाच्या व भाजपाच्या विचारात जमीन आसमानाचा फरक आहे. एेक्य विचारांचे व्हावे सत्ता हे आपले अंतीम ध्येय नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट आहे. आंबेडकरवादी व मनुवादी एका नावेत बसू शकत नाहीत म्हणून रिपब्लिकन पक्षाची आघाडी, विलीनकरणी अथवा एेक्य करावयाच्या अगोदर रामदास आठवले यांनी भाजपाशी असलेले सर्व संबंध, युती तोडावी असे आवाहन खरात यांनी केले आहे.
