मुंबई, दि. 21 May :- राज्यातील कृषीक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी 1 जुलै रोजी 'कृषी दिन'साजरा होत असताना, याच दिवशी'राज्य मतदार दिवस' साजरा करण्याचा शासननिर्णय जारी करुन राज्य सरकारने स्वर्गीय नाईक साहेबांचा अपमान केला असून त्यांचे महत्व जाणीवपूर्वक कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केला. हा अवमानकारक, वादग्रस्त शासननिर्णय मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली.
विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याद्वारे हा विषय उपस्थित करताना श्री. मुंडे यांनी १ जुलै रोजी 'राज्य मतदार दिवस' साजरा करण्याबाबत शासनाने काल (२० मे) जारी केलेल्या शासननिर्णयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. श्री. मुंडे म्हणाले की, राज्यातल्या कृषीक्रांतीचे जनक म्हणून स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांचा १ जुलै हा जन्मदिवस'कृषी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतला होता. तेव्हापासून हा दिवस राज्यभर कृषीविषक विविध उपक्रमांनी साजरा होतो. ही वस्तुस्थिती असताना आता हा दिवस 'राज्य मतदार दिवस'म्हणून साजरा करण्याचा निर्णयशासनाने काल जारी केला. यातून वसंतराव नाईक साहेबांचे कर्तृत्व व महत्व कमी दाखवण्याचा शासनाचा हेतू असून तो सहन केला जाणार नाही. या शासननिर्णयामुळे राज्यातील जनतेत संताप असून हा निर्णय शासनाने मागे घ्यावा, अशी मागणीही श्री. मुंडे यांनी केली. विद्यमान शासनाकडून अशा प्रकारचे प्रयत्न यापूर्वीही सातत्याने झाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले