मुंबई : मुंबईबाहेरील दगडखाणींवर घातलेल्या बंदीमुळे मुंबईतील रस्त्यांच्या कामांवर परिणाम झाला असल्यामुळे रस्ते कामांचा 'वेग' मंदावला आहे, असे मत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. गुरुवारी रात्री आदित्य यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेत्यांसह रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. रस्त्यांच्या कामांवर दगडखाणी बंदीचा परिणाम झाला आहे, असे ट्विट ठाकरे यांनी केले आहे.
मुंबईतील रस्त्यांची कामे दगडखाणींवरील बंदीमुळे रखडल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी आदित्य यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले होते. 'मुख्यमंत्र्यांनी खाणींसंबंधी दिलेल्या आश्वासनाचा फायदा होऊन लवकरच यावर योग्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली असून, या भेटीनंतर ठाकरे यांनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. आदित्य यांच्यासोबत असलेले महापौर आणि रस्ते विभागाच्या अधिकार्यांनी कुलाबा, चर्चगेट जंक्शन, बाबुलनाथ रोड, महात्मा गांधी रोड, बोमन बेहराम रोड, ताडदेव, रजनी पटेल चौक, सिद्धिविनायक जंक्शन, न. चिं. केळकर रोड, शिवनेरी जंक्शन, दादर टीटी, सुलोचना शेट्टी जंक्शन या रस्त्यांच्या कामांची गुरुवारी रात्री पाहणी केली. रस्त्यांच्या कामांसाठी लागणारी खडी आणि कच्च्या मालाचा तुटवडा भासत असल्याने रस्त्यांची कामे मंदावली आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
रस्ते कामांतर्गत उपयोगिता सेवांच्या (युटीलिटी सर्व्हिसेस) केबल्स टाकणे, सांडपाण्याच्या निचर्यासाठी गटारे बनवणे, पदपथ तयार करणे अशी कामे केली जात आहेत. वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळाल्याने काही ठिकाणी रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी व जलदगतीने होतील, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाणे जिल्ह्यातील दगडखाणींवर बंदी आल्यानंतर कंत्राटदार उरणमधील दगडखाणींतून खडी आणत आहेत. मात्र खडीची मागणी जास्त व पुरवठा कमी असे व्यस्त प्रमाण आहे, असे कळते.