मुंबई, दि. 16 : स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यात 1 मे पासून पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम सुरू झाली आहे. या तपासणी मोहिमेत गेल्या पंधरा दिवसात सुमारे एक लाख 16 हजार जणांनी ऑनलाईन नोंदणी करून आरोग्य तपासणी करून घेतली आहे. ही मोहिम 27 मे 2017 पर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत तपासणी मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 1 मे पासून पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात सुरुवात झाली असून ती 27 मे 2017 पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेत रुग्णांची विविध तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच या तपासणीत आढळलेल्या रोगांवर पुढील उपचार करण्यासाठी मार्गदर्शन व मदत करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांना शासकीय योजनांमधून पुढील उपचार करण्यात येणार आहेत. ज्यांना सध्याच्या योजनांमधून लाभ मिळू शकणार नाही, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या जिल्ह्याच्या ठिकाणीच उपचारासाठी मदत मिळण्यासाठीही सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक संस्था, अशासकीय संस्था व कंपन्यांच्या सामाजिक उत्तर दायित्व उपक्रमांचीही मदत घेण्यात येणार आहे. आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेतील रुग्णांच्या आजारासंबंधी संशोधन करून त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.
या पथदर्शी मोहिमेत सहभागी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा,बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, अकोलाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आपापल्या जिल्ह्यात मोहिमेला गती मिळावी, म्हणून बैठका घेऊन सूचना दिल्या आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारीही जिल्हा समन्वय समिती समवेत जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्यपूर्व तपासणी मोहिमेत सहभागी व्हावे, यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जाऊन पाहणी व तपासणी करत आहेत.
पथदर्शी मोहिमेसाठी निवडलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये येत्या 27 मे पर्यंत किमान एक लाख नागरिकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभाग व वैद्यकिय शिक्षण विभागाने प्रयत्न करावे.सामाजिक संस्था तसेच समाजसेवक, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन आरोग्यपूर्व तपासणी करण्यात प्रयत्न करावे असे आवाहन वैद्यकिय शिक्षण मंत्री महाजन यांनी यावेळी केले.