एट्रोसिटी कायदयानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल - सोलापूर - 'सैराट' फेम नागराज मंजुळे यांच्या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलेल्या सुरज पवारच्या कुंटुंबियांना मारहाण झाल्याची घटना उघड झाली आहे. नागराजसमवेत वास्तव्यास असणाऱ्या सुरजचे कुटुंबिय करमाळा तालुक्यातील पोफळज येथे राहते. त्याच्या आजी व आजोबांसह कुंटुंबातील इतर मंडळींना गावकऱ्यांनी बुधवारी रात्री मारहाण केल्याचा प्रकार घडला. यासंदर्भात गुरुवारी करमाळ्यात आठ जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय युवतीने पोलिसात फिर्याद नोंदविली आहे. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, बुधवारी सांयकाळी साडेसात वाजता विठ्ठल क्षीरसागर , सचिन पवार, प्रवीण पवार, अविनाश पवार, राजेंद्र सुरवसे, श्रीनाथ पवार, विलास धुमाळ आणि विकास रगडे यांनी नवऱ्याची विचारपूस करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर यावळी त्यांनी घरावर दगडफेक केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी घरातील वस्तुंची तोडफोड केली आहे. या घटनेची माहिती सुरजलाही देण्यात आली असून त्याच्या घराभोवती सुरक्षिततेसाठी पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी या प्रकरणाचा तपास करत आहेत.