मुंबईच्या आझाद मैदानात ८ मेला आंबेडकरी जनतेची धडक -
मुंबई / प्रतिनिधी - परभणी पूर्णा येथील आंबेडकर जयंती मिरवणुकीवर झालेली दगडफेक आणि लातूर औसा येथील मागोरगा येथे बौद्ध समाजातील लोकांना झालेली मारहाण यामुळे बौद्ध समाजात संतापाची लाट पसरली आहे. बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार होत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी ८ मे ला आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने बौद्ध समाज एकत्र जमून मुख्यमंत्री, राज्य सरकारला जाब विचारणार आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे डॉ. बाबासाहेब डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीवर काही जातीवाद्यांकडून दगडफेक करण्यात आली. त्यात अनेक लोक गंभीर जखमी झाले. या घटनेला एका महिना होत आला तरी अद्याप दगडफेक करणार्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात आली नाही. दगडफेकी नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी असलेल्या निरपराध बौद्ध तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. राज्याचा स्थापना दिन (१ मे) महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा केला जात असताना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामधील मागोरगा गावात डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून तेथील बौद्धांना मारहाण करण्यात आली. या दोन्ही घटनांमधील दोषींना फडणवीस सरकारने अभय दिले आहे. फडणवीस यांचे सरकार आणि पोलीस या दोषींना अटक करण्यास टाळाटाळ करत आहे. अल्पसंख्यांक असलेल्या बौद्ध समाजावर अत्याचार होत असताना राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही ठिकाणी भेट देण्याचे टाळले आहे. यावरून खुद्द मुख्यमंत्रीच समाजकंटकांना पाठीशी घालत असल्याची भावना आंबेडकरी जनतेमध्ये निर्माण झाली असून फडणवीस सरकार विरोधात आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. फडणवीस सरकार आंबेडकरी जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने सरकारला जाब विचारण्यासाठी विविध आंबेडकरी संघटना सोमवारी ८ मे ला मुंबईच्या आझाद मैदानात धडक देणार आहेत.
आंबेडकरी जनतेच्या मागण्या -
> पूर्णा आणि औसा या दोन्ही घटनांची सरकारने सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कडक कारवाई करावी
> पूर्णा दगडफेक प्रकरणातील जखमींना शासकीय मदत मिळावी
> दोन्ही घटनांमध्ये बौद्ध तरुणांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे रद्द करावेत