मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या मुंबईतील पाच ठिकाणांवर 'ईडी'ने (अंमलबजावणी संचालनालय) छापेमारी केली आहे. वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) झालेल्या १00 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाप्रकरणी ईडीने २0१४ सालीच गुन्हा दाखल केला होता.
ईडीच्या वतीने बुधवारी सकाळपासूनच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर रफिक मकबूल कुरेशी यांच्या घरांसह इतर पाच ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. या वेळी कागदपत्रे, पेन ड्राईव्ह, हार्ड डिक्स आदी वस्तू जप्त केल्या असून याचा अधिक तपास सुरू केल्याचे ईडीच्या अधिकार्यांनी सांगितले. काँग्रेस आघाडीच्या काळात सिद्दिकी गृहराज्य मंत्री होते. त्या वेळी त्यांनी वांद्रे येथील झोपू योजनेचे सर्व नियम धाब्यावर बसवून १00 कोटींच्या घोटाळय़ाबरोबरच बेकायदेशीर पैशांची देवाणघेवाण (मनी लाँडरिंग) केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या घोटाळय़ात बाबा सिद्दिकी यांच्यासह त्यांचा साथीदार बिल्डर रफीक कुरेशी याचा हात असल्याचा आरोप आहे. यातूनच ईडीने छापेमारीची कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. नियमानुसार वांद्रे परिसरातील झोपडपट्टीचा विकास करायचा असेल तर त्यातील एक भाग झोपडपट्टीधारकांसाठी ठेवावा लागतो. मात्र बनावट कागदपत्रे बनवून हा घोटाळा केल्याचा ठपका बाबा सिद्दिकी आणि रफीक कुरेशींवर आहे. या छापेमारीदरम्यान बिल्डर रफीक कुरेशी यांच्या कंपनीने बाबा सिद्दिकींच्या कंपनीला पैसे दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सिद्दिकी आणि कुरेशी यांच्यासह १५७ लोकांवर ईडीने गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. या घोटाळय़ाचा उलगडा २0१४ साली झाला होता. ईडीने त्याच वेळी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ईडीच्या या कारवाईमुळे बाबा सिद्दिकींच्या अडचणी वाढल्या आहेत. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून बाबा सिद्दिकी तीन वेळा निवडून आले होते. मात्र २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनी त्यांचा पराभव केला.