भांडुप परिसरात असणा-या महापालिकेच्या जलअभियंता खात्याचा जलशुद्धीकरण प्रकल्पात दररोज २ हजार ३०० दशलक्ष लीटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. यासाठी दर महिन्याला साधारणपणे ४५ लाख युनिट, तर वर्षाला साधारणपणे ५ कोटी ४० लाख युनिट एवढी वीज लागते. यासाठी वीज वापरापोटी दर महिन्याला सुमारे ३ कोटी ५० लाख; तर वर्षाला सुमारे ४२ कोटी एवढा खर्च येतो. हा वीज खर्च कमी होण्याच्या दृष्टीने महापालिकेने 'आय. आय. टी. - मुंबई' च्या सहकार्याने वर्ष २०१५ मध्ये केलेल्या अभ्यासाअंती या परिसरात १२.५ मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारुन विद्युत खर्चात सुमारे ३३ टक्के बचत साध्य होऊ शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला होता.
त्यानुसार भांडुप पश्चिम परिसरात असणा-या जलशुद्धीकरण प्रकल्पात सौरउर्जा प्रकल्प उभारणीस सुरुवात झाली आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे २६ हजार चौरस मीटर जागेवर पथदर्शी सौरउर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरु झाले आहे. या प्रकल्पासाठी ७ हजार ८१३ सौरउर्जा पॅनल लावले जाणार आहेत. या पॅनलचे अंदाजित आयुर्मान हे २५ वर्षे एवढे अंदाजित आहे. या २.५ मेगावॅट क्षमतेच्या पथदर्शी प्रकल्पातून दरवर्षी ३२ ते ३५ लक्ष युनिट एवढी वीज निर्मिती होईल. ज्यामुळे महापालिकेच्या वार्षिक वीज खर्चात सुमारे ३ कोटी रुपयांची बचत होईल अशी अपेक्षा आहे. हा पथदर्शी प्रकल्प जानेवारी - २०१८ मध्ये कार्यान्वित होईल, असा अंदाज आहे.
प्रकल्पाच्या दुस-या टप्प्यात भांडुप संकुल परिसरात १० मेगावॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये ३१ हजार २५२ सौरउर्जा पॅनल्सद्वारे दरवर्षी १ कोटी ४० लाख युनिट वीजेची निर्मिती होईल असा अंदाज आहे. याचाच अर्थ भविष्यात १२.५ मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे १ कोटी ७५ लाख युनिट एवढी वीज निर्मिती होऊ शकेल. ज्यामुळे संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भांडुप संकुलाच्या एकूण विजेच्या गरजेपैकी साधारणतः ३३ टक्के गरज ही या सौरउर्जेतून भागविली जाईल. ज्यामुळे महापालिकेच्या वीज खर्चात दरवर्षी सुमारे १४ कोटी रुपयांची बचत होऊ शकेल.
जलअभियंता खात्याच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या या सौरउर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही विद्युत वितरण कंपनीच्या ग्रीडला जोडली जाणार आहे. परिणामी जेवढी वीज निर्माण होईल, तेवढे युनिट्स महापालिकेच्या देयकातून वजा करण्यात येणार आहेत, अशीही माहिती बांबळे यांनी दिली आहे.