महापालिकेतील भुताटकीची अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार चौकशी करा - दिलीप गायकवाड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेतील भुताटकीची अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार चौकशी करा - दिलीप गायकवाड

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव - 
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील भुताटकीची खोडसाळ माहिती पसरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करावे अशी मागणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. तसेच या भूत प्रकरणाची महाराष्ट्रात लागू असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार चौकशी करावी अशी मागणीही दिलीप गायकवाड यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे केली आहे.

मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग दुसऱ्या मजल्यावर सुरु केल्यापासून मुंबईत आगीच्या मोठ्या घटना घडल्याचे फोन येणे, रात्रीच्यावेळी कर्मचाऱ्यांना कमी अधिक कर्मचारी दिसणे, काचांचा आवाज येणे, चालण्याचा आवाज येणे असे विचित्र भास व्हायला लागले. त्यामुळे रात्रीच्यावेळी येथे काम करणे कर्मचाऱ्यांना कठीण झाले होते. परंतु वास्तूशांती आणि पूजा केल्यानंतर हे प्रकार काही प्रमाणात कमी झाल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगीतल्याचे वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहे. वृत्तपत्रांमधून आलेल्या या बातम्यांमुळे अनेक लोकांमध्ये व महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामुळे महापालिकेत कोणत्या कर्मचाऱ्यांनी भुत बघितले, कोणत्या दिवशी अशी घटना घडली त्याचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावेत. भुत घालवण्यासाठी कोणत्या तांत्रिकावर पालिकेने किती खर्च केला, त्यासाठी कोणती बैठक घेण्यात आली, भुतांसंदर्भात पूजा घालण्याबाबत कोणता ठराव मंजूर करण्यात आला याची माहिती गायकवाड यांनी मुंबईचे महापौर व महापालिका आयुक्तांकडून मागितली आहे. पालिकेतील भुताची बातमी चुकीची व खोटी असल्यास संबंधित बातमी वृत्तपत्र माध्यमांकडे पसरवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त व पोलिसांनी याबाबत योग्य ती कारवाई न केल्यास महापालिकेविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलीप गायकवाड यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages