मुंबई / प्रतिनिधी - मुंबईच्या देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडवर रात्रीच्यावेळी गुंडाचा मुक्त संचार असतो. गुंडां या विभागात येण्यापासून रोखण्यासाठी आणि कचऱ्याची विल्हेवाट लावताना प्रकाश असावा म्हणून डम्पिंग ग्राउंडमध्ये भाडेतत्वावर हायमस्ट दिवे लावले जाणार आहेत. यासाठी महापालिका ९८.२६ कोटी रुपये वर्षाला खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
गोवंडी मानखुर्द येथील देवनार डम्पिंग ग्राऊंडवर सध्या ३२०० मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दिवस रात्र हे काम सुरु असते. डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्याचा धंदा करणारे माफिया तयार झाले आहेत. हे माफिया व त्यांचे गुंड अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी पवेश करतात. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास अडथळा निर्माण होत असतो. डम्पिंगची सुरक्षितता लक्षात घेवून महापालिकेने येथे हायमस्टचे दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेतत्वावर हायमास्ट दिवे लावण्यासाठी मल्हार हायरिंग सर्विसेस या कंत्राटदाराला वर्षभरासाठी ९८.२६ कोटी रुपयाचे कंत्राट देण्यात आले आहे. हा कंत्राटदार क्षेपणभूमीवर आठ हायमस्ट दिवे लावणार आहे. या दिव्याचा दिवासाचा खर्च १२.५० लाख रुपये येणार आहे.