मुंबई / प्रतिनिधी - मुंबई शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आणि येत्या काही आठवडय़ात पावसाळा सुरु होणार असून नालेसफाई व रस्त्यांच्या दुरुस्ती कामे प्रगती पथावर आहेत. हि सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) पल्लवी दराडे यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने अधिकाऱयांना दिले.
बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने नालेसफाई व रस्ते दुरुस्ती कामांसंदर्भातील कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेतली आहेत. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नालेसफाई व रस्त्यांच्या कामांसंदर्भात संबंधित अधिकाऱयांना मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी आज (दिनांक २३ मे, २०१७) शहर विभागातील रस्ते, नालेसफाई व विकास प्रकल्प यांची पाहणी केली. यावेळी नालेसफाई करताना नागरिकांना माहिती व्हावी याकरीता आवश्यक त्या ठिकाणी माहितीफलक लावण्याचे व माहितीफलकाची संख्या वाढवावी. पावसाचे आगमन येत्या काही दिवसांतच होणार असल्याने रस्ते दुरुस्ती कामांचे नियोजन करुन संबंधीत विविध यंत्रणांशी समन्वय साधून कार्यवाही पूर्ण करावीत, प्रगती पथावर सुरु असलेली कामे व्यवस्थित पार पाडावीत, प्रती वर्षी ज्या-ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलते अशा ठिकाणी आवश्यक तेवढे पंप उपलब्ध ठेवण्यात यावेत असे आदेश दराडे यांनी यावेळी दिले.
आज झालेल्या रस्ते व नालेसफाई पाहणी दरम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी वरळी लव्हग्रोव्ह पंम्पिंग स्टेशन, एल. पी. जी. नाला, टेक्सटाईल नाला, दादर-धारावी नाला, वडाळा ट्रक टर्मिनल, जे. के. केमिकल नाला, आर. के. किडवई मार्ग, हार्डिकर मार्ग येथील सिमेंट कॉंक्रीटीकरण कामे, तानसा पाईपलाईन संदर्भातील कामे, शीव- कोळीवाडा येथील स्थलांतरित करण्यात येणारी दुकाने व रे रोड जवळील ब्रिटानिया पंम्पिंग स्टेशनची पाहणी केली. यावेळी उप आयुक्त (परिमंडळ - १) सुहास करवंदे, उप आयुक्त (परिमंडळ - २) आनंद वागराळकर, सहायक आयुक्त रमाकांत बिरादार, प्रशांत सपकाळ, केशव उबाळे, उप प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) पी. पी. खेडेकर हे अधिकारी उपस्थित होते.