मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱयांच्या सुखदुःखात आर्थिकदृष्टय़ा त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱया आणि राष्ट्रीय व राज्यस्तरीय अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या 'दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई' या बँकेला महाराष्ट्र शासनाच्या 'सहकार भूषण' या पुरस्काराने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
महापालिका कर्मचाऱयांच्या बँकेचे कार्याध्यक्ष आणि महापालिकेच्या शिक्षण खात्याचे उपायुक्त मिलिन सावंत व बँकेचे संचालक मंडळ यांनी सोलापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एका शानदार समारंभादरम्यान राज्यपाल सी. विद्यासागर राव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महापालिका कर्मचाऱयांच्या 'दि म्युनिसिपल को-ऑप. बँक लि., मुंबई' या बँकेस 'सहकार भूषण' हा बहुमोलाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्र राज्यातील पुरस्कार पात्र सहकारी संस्थांची अंतिम निवड करण्यासाठी सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने बँकेस काही महत्वाच्या निकषांमध्ये उत्तम कामगिरीसाठी जास्तीत जास्त गुण दिले. यात मागील सलग १० वर्षे होत असलेला नफा, लाभांश दर जास्तीत जास्त (१५ टक्के),मागील १० वर्षात सतत ५ टक्केपेक्षा कमी थकबाकी राखणे, मागील सतत १० वर्षे लेखा परिक्षण अहवालानुसार 'अ' वर्ग प्राप्त, कोअर बँकींग सोल्यूशन, रुपे ए.टी.एम. व मोबाईल बँकींग व्यवस्था तसेच सी.डी. रेशो ६५ टक्के ते ७० टक्के दरम्यान ठेवण्यात यशस्वी, अशा निकषांचा समावेश आहे. सदर समितीच्या मान्यतेनुसार, सन २०१५-२०१६ या वर्षासाठी सहकारी संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कारार्थी संस्थांची नांवे निश्चित करण्याकरीता सहकार मंत्री श्री.सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेची महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांमधून 'सहकार भूषण' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे पदसिद्ध अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता आणि पदसिद्ध उपाध्यक्ष तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने मोठय़ा प्रमाणात आपल्या कामाचा विस्तार वाढविलेला आहे. या बँकेचे कार्याध्यक्ष, महापालिका उपायुक्त मिलिन सावंत व उप-कार्याध्यक्ष, महापालिका उपायुक्त विजय बालमवार तसेच बँकेचे संचालक मंडळ यांनी बँकेचे उत्तमरित्या व्यवस्थापन आणि नियोजन केल्यामुळे सर्वांगीण आर्थिक प्रगतीतही मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आहे. 'दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड' या बँकेला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
'दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई' ही महानगरपालिका कर्मचाऱयांची बँक असून दिनांक ३१.०३.२०१७ पर्यंत ८६४५२ महापालिका कर्मचारी बँकेचे सभासद आहेत. तसेच ९३८५ नामधारी सभासद आहेत. ही बँक महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांच्या सर्वांगीण आर्थिक गरजा भागविण्यासाठी कार्यरत आहे. महापालिका कर्मचाऱयांस विविध कर्ज सुविधा देत असते. तर नागरिकांसाठी बँकींग सुविधा उत्तमरित्या देत असते. कोअर बँकींग,आर.टी.जी.एस., एन,ई,एफ.टी., पॉस इत्यादी सुविधा बँक देते. बँकेकडे एन्.पी.सी.आय्.च्या रुपेचे थेट सभासदत्व असून बँकेची मुंबई व उपनगरात विविध ठिकाणी स्वतःची १० ए.टी.एम. केंद्रे आहेत. बँकेने मोबाईल बँकींग सेवा सुरु केली आहे. तसेच या बँकेने एखाद्या खाजगी बँकेसारखीच अद्ययावत टेक्नॉलॉजीवर आधारित बँकींग सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. बँकेचा ग्रॉस एन.पी.ए. सन २०१६ मध्ये १.८४ टक्क्यांवरुन १.५४ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तर निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के असल्याचे बँकेचे महाव्यवस्थापक (प्र.) विनोद रावदका यांनी सांगितले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, उत्कृष्ट नियोजन तसेच सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीमुळे बँकेने गेल्या १० वर्षांत चौफेर प्रगती केली असून सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षासाठी बँकेस महाराष्ट्र शासनाचा सहकार क्षेत्रातील 'सहकार भूषण' पुरस्कार प्राप्त झाला आहे.
'दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई' या बँकेचे कार्याध्यक्ष मिलिन सावंत यांनी 'सहकार भूषण' पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बँकेच्या सर्व संचालकांचे, कर्मचारी/ अधिकाऱयांचे कौतुक केले आहे.