मुंबई, दि. 4 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ग्लोबल डेस्टिनेशन होण्यासाठी जगभरातील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा अभ्यास केला जावा, त्यातील सर्वोत्तम संकल्पनांचा स्वीकार करत या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी, अशा सूचना आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वन सचिव विकास खारगे यांच्यासह वन विभागाचे तसेच महाराष्ट्र राज्य इको टुरिझम बोर्डचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ताडोबाला आल्यानंतर पर्यटकाला एक मिनिटासाठीही कंटाळवाणे वाटू नये इतकी त्यांची वनपर्यटनाची सफर यशस्वी झाली पाहिजे आणि तो तेथून समाधानी होऊनच बाहेर पडला पाहिजे. त्यादृष्टीने या प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप निश्चित केले जावे अशा सूचना देऊन मुनगंटीवार पुढे म्हणाले की, त्यासाठी आवश्यक त्या सर्व नावीन्यपूर्ण संकल्पना तिथे राबविल्या जाव्यात. ताडोबाला आलेल्या पर्यटकाला खात्रीशीररित्या वाघ पाहाता येईल अशी व्यवस्था व्याघ्र सफारीच्या माध्यमातून केली जावी तसेच ताडोबाच्या भेटीदरम्यान इतर करमणूक कार्यक्रमाचाही त्यात समावेश करावा. तेथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था असावी, स्थानिक लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह एकूण ताडोबाची माहिती, येथील वन्यजीवांचा वावर आणि त्यांची माहिती, ताडोबाची वैशिष्ट्ये असा ज्ञानवर्धक माहितीचा खजिनाही पर्यटकांना उपलब्ध करून दिला जावा.
इतर देशातील आंतरराष्ट्रीय वन पर्यटनस्थळे कशी विकसित झाली याचा अभ्यास केला जावा तसेच तेथील चांगल्या कल्पनांचा स्वीकार करतांना भारतीय वैशिष्ट्येही लोकांसमोर कशी जातील हे देखील पाहिले जावे. ताडोबा-अंधारी प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ करण्यासाठी काय काय करावे लागेल याची निश्चिती करून त्याची यादी तयार केली जावी, अशा सूचनाही वनमंत्र्यांनी यावेळी दिल्या.