रेल्वे हद्दीतील नालेसफाईसाठी महापालिकेद्वारे '२ कोटी ७९ लाख' रुपये -
मुंबई / प्रतिनिधी -महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे स्थानक या दरम्यान हार्बर मार्गावर मध्य रेल्वेद्वारे करण्यात येत असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान हार्बर मार्गावर करण्यात येत असलेली कामे सध्या व्यवस्थित सुरु असून दोन्ही यंत्रणांमध्ये सुव्यवस्थित समन्वयन साधला जात असल्याने नालेसफाईची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, असा विश्वास महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना लक्षात घेता पावसाळ्यादरम्यान पावसाचे पाणी योग्यप्रकारे वाहून जावे यासाठी महापालिकेद्वारे पावसाळापूर्व नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. महापालिका क्षेत्रातील रेल्वेच्या हद्दीत असणा-या छोट्या पूलांच्या खालील (Culvert) नाल्यांची सफाईची कामे रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात येतात. मध्य रेल्वे हद्दीतील यावर्षीच्या नालेसफाईसाठी महापालिकेद्वारे मध्य रेल्वेला २ कोटी ७९ लाख ६९ हजार ३२८ रुपये यापूर्वीच देण्यात आले आहेत.
या अनुषंगाने मध्य रेल्वेद्वारे हार्बर मार्गांवरील नालेसफाई कामांचा संयुक्त पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला होता. यासाठी रेल्वेच्या टॉवर वॅगनमधून प्रवास करुन हार्बर मार्गाच्या नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यात आली. सदर पाहणीदरम्यान महापालिका आयुक्तांनी प्रामुख्याने महापालिकेच्या 'बी' विभागातील मस्जिद बंदर - सँडहर्स्ट रोड; 'एफ उत्तर' विभागातील वडाळा ते गुरु तेग बहादुर नगर, गुरु तेग बहादुर नगर ते चुनाभट्टी आणि 'एम पूर्व' विभागातील चेंबुर ते गोवंडी, गोवंडी ते मानखुर्द या दरम्यानच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाई कामांची पाहणी केली.
महापालिका आयुक्त अजोय मेहता व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या संयुक्त पाहणी दौ-यादरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, उपायुक्त (मनपा आयुक्त कार्यालय) रमेश पवार, उपायुक्त (परिमंडळ २) आनंद वागराळकर, महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक प्रकाश कदम यांच्यासह महापालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी व मध्य रेल्वेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.