मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात डॅाक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर केईएम, लोकमान्य टिळक, नायर व कूपर या रुग्णालयात खासगी सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय़ महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सध्या असलेल्या सुरक्षेत असलेल्या 400 सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त 1 मे नंतर आणखी 321 खासगी सुरक्ष तैनात केले आहेत. त्यासाठी पालिका या खासगी सुरक्षा रक्षकांवर 11 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेची केईएम, लोकमान्य टिळक शीव व नायर ही तीन मुख्य रुग्णालये आहेत. सध्या केईएम रुग्णालयांत 31, नायर 28, लोकमान्य टिळक रुग्णालयांत 72 व आर एन कुपर रुग्णालयांत 23 असे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र मागील मार्चमध्ये नातेवाईकांकडून डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर तातडीने सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तातडीने प्रशासनाने रुग्णालयात 400 सुरक्षा रक्षक तैनात केले. त्यानुसार केईएम मध्ये 112, लोकमान्य टिळक रुग्णालयांत 104, नायर रुग्णालयांत 76 व आर. एन. कूपर रुग्णालयांत 29 खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. या सुरक्षा व्यवस्थेत मे महिन्यानंतर आणखी 321 सुरक्षा रक्षकांची वाढ केली आहे. यापूर्वी नियुक्त करण्यात आलेले 400 व आता 321 असे एकूण 721 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. हे सर्व सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे आहेत. 1 मे नंतर वाढवलेल्या 321 सुरक्षा रक्षकांपैकी केईएम रुग्णालयात 112 रक्षकांसाठी 4 कोटी 9 लाख, शिव रुग्णालयातील 104 रक्षकांसाठी 3 कोटी 87 लाख, नायर रुग्णालयातील 76 रक्षकांसाठी 2 कोटी 64 लाख, तर कुपर रुग्णालयातील 29 रक्षकांसाठी 80 लाख असे एकूण वर्षाला 11 कोटी रुपये खर्च करणार आहे.