मुंबई - मुंबई पालिका रुग्णालयांत सर्वसामान्य रुग्णांना चांगली सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी असताना ते दूर करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी राजकारण्यांना व त्यांच्याकडून येणा-या रुग्णांना प्राधान्यांने वैद्यकीय सुविधा द्या असे आदेशवजा पत्र महापालिका रुग्णालयांचे संचालक व केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी काढले आहे. या आदेशामुळे आता राजकारणी पाठवतील त्याच रुग्नांना प्राधान्य मिळणार असल्याने सर्वसामान्य करदात्या नागरिकांना उपचारासाठी ताटकळत ठेवले जाण्याची शक्यता असल्याने या पत्रा विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
शिकाऊ डॅाक्टरांकडून नवीन नगरसेवकांना रूग्णालयात चांगली ट्रिटमेंट मिळत नाही. स्टाफ अरेरावीने वागतो, डॉक्टर फोन उचलत नाहीत, उपचार घेण्यासाठी आम्हाला रांगेत उभे रहावे लागते, त्यामुळे व्हिआयपी ट्रिटमेंट मिळावी अशी नगरसेवकांची तक्रार होती. वैद्यकीय उपचार करा असे पत्राव्दारे सूचना रुग्णालयातील स्टाफला करण्यात आल्या आहेत. खासदार, आमदार तसेच नगरसेवक यांच्याशी सौजन्याने बोलावे तसेच त्यांच्याकडून येणा-या रुग्णांना प्राधान्याने वैद्यकीय उपचार देण्यात यावेत. तसेच आपण संवाद कौशल्य वाढवून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधावा, जेणेकरून रुग्ण व डॅाक्टर यांचे विश्वासाचे नाते निर्माण होण्यास मदत होईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
खासदार, आमदार, नगरसेवक व लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्याकडून येणा-या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करा असे आदेश देताना रुग्णालयाच्या स्टाफच्या माहितीसाठी महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य समिती, स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती, गटनेते तसेच विभाग समिती सदस्यांची मोबाईल नंबरसह यादीही या पत्रासोबत तयार करण्यात आली आहे. त्यांनी पाठवलेल्य़ा रुग्णांना वैद्यकीय उपचार प्रथम प्राधान्याने द्या अशा सूचना या पत्राव्दारे देण्यात आल्या आहेत. दरम्यान, हे पत्र अद्याप वाचले नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्ष रोहिणी कांबळे यांनी सांगितले.