मुंबई, दि. 9 : शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्ती वय 58 वरुन 60 केल्याबाबतचा सोशल मिडीयामध्ये फिरत असलेला शासन निर्णय बनावट असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
शासन निर्णय क्र. अकंपा-1217/प्र.क्र.46/आठ, दि. 3 मे 2017 अन्वये अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या दहा टक्के असलेली मर्यादा दिनांक 1 मार्च 2017 पासून पुढे दोन वर्ष (दिनांक 28 फेब्रुवारी 2019) पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाचा संकेतांक क्रमांक हा 20175031552550207 असा आहे. हा शासन निर्णय अनुकंपा नियुक्तीशी संबंधित आहे.
या शासन निर्णयाचा क्रमांक तसेच संकेतांक क्रमांकाचा वापर करुन गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरुन 60 करण्याबाबतचा बनावट शासन निर्णय क्र. अकंपा-1217/प्र.क्र.46/आठ, दि. 8 मे 2017 रोजी तयार करण्यात आला असून हा बनावट शासन निर्णय सोशल मिडीयावर (व्हॉटस अप इ.) फिरत आहे. सदर शासन निर्णय हा बनावट असून तसेच सा.प्र.वि./का.8 कडून असा कोणताही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही.