मनसेच्या दणक्याने ठरावांच्या सूचनांवरील अभिप्राय वेळेत मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 May 2017

मनसेच्या दणक्याने ठरावांच्या सूचनांवरील अभिप्राय वेळेत मिळणार

मुंबई (प्रतिनिधी) - नगरसेवकांच्या महत्वाच्या ठरावांच्या सूचनांवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अभिप्राय न देता वेळकाढू धोरण अवलंबले जाते. परिणामी महत्वाचे मुद्दे निकाली निघत नाहीत. याबाबत मनसेने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने २७ पैकी २० ठरावांच्या सुचनांवर येत्या आठ दिवसात अभिप्राय देण्याची कबूली दिली आहे.


हुतात्मा चाफेकर बंधूंचे शिल्प उभारण्याबाबतच्या ठरावाच्या सूचनेवर प्रशासनाने चाफेकर बंधूंच्या देशकार्याचा इतिहास मिळत नाही, असे कारण पुढे केले होते. याबाबत मनसेचे पालिका गटनेते दिलीप लांडे यांनी विधी समितीच्या बैठकीत हरकत घेतली. मुंबईच्या दृष्टीकोनातून एकूण २३६ ठरावांच्या सूचनांचे अभिप्राय अद्यापपर्यंत कार्यवाहीविना पडून आहेत. यामध्ये महाराष्ट्र भवन बांधणे, खाजगी सोसायट्यांमध्ये गांडूळ प्रकल्प राबविणे बंधनकारक करणे, पालिका रुग्णालयांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टरांना पुरस्काराने गौरविणे, शिक्षण खात्यामार्फत सादर होणाऱ्या बालकोत्सवास बाळासाहेब ठाकरे ह्यांचे नाव देणे, स्वच्छतेचे महानकार्य करणाऱ्या संस्था- शाळांना संत गाडगेबाबा चषक देणे, पालिका शाळांमध्ये इयत्ता ९ वी आणि १० वीचे वर्ग सुरु करणे, प्रत्येक पालिका रुग्णालयात मोफत रुग्णवाहिका सेवा पुरविणे, खाजगी इमारतींमध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून नागरी सुविधा पुरविणे इत्यादी महत्वाच्या ठरावांच्या सूचनांवर प्रशासनाकडून वेळीच अभिप्राय मिळत नसल्याचे सांगत विशेष बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार गुरुवारी झालेल्या विशेष विधी समितीच्या बैठकीत २७ पैकी सात ठरावांच्या सूचनांचे अभिप्राय दिले. तसेच उर्वरित २० सूचनांवर येत्या आठ दिवसात अभिप्राय देण्याची कबूली पालिका प्रशासनाने दिली आहे.

Post Bottom Ad