मुंबई, दि. ४ : राज्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनांच्या पुणे आणि नाशिक विभागांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव विवेक नाईक आणि पुणे आणि नाशिक येथील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या की, राज्यात या योजनेतून पूर्वी वर्षाला ८०० कि.मी. रस्त्यांची कामे झाली आहेत या वर्षी दोन्ही योजनांची एकूण २ हजार ५०० कि.मी. कामे होत आहेत. तसेच दर्जेदार कामे होत असून यावर्षी ७ हजार कि.मी. उद्दिष्ट असल्याने अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करावे असे सांगितले. राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची एकूण १ हजार २५६ कामे मंजूर करण्यात आली असून ७ हजार ५८४ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. त्या कामांसाठी ४ हजार २०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मार्च २०१७ पर्यंत एकूण ३७१.९५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.