नालेसफाईमधील भ्रष्टाचार उघड होण्याची महापालिका अधिकाऱ्यांना भीती -
मुंबई / अजेयकुमार जाधव - मुंबई महानगरपालिकेत नालेसफाईचा घोटाळा झाल्यावर अनेक कंत्राटदार, अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र नालेसफाई घोटाळा होऊ नये म्हणून पालिकेने योग्य उपाय योजनाच केलेली नाही. नालेसफाई सुरु असलेल्या व गाळ टाकला जात असलेल्या ठिकाणी नक्की गाळ टाकला जात आहे का हे उघड होऊ शकत असल्याने महापालिका अधिकारी सीसीटीव्ही लावण्यास तयार नाहीत. यामुळे नालेसफाई सुरु असलेल्या व गाळ टाकला जाणाऱ्या सर्व ठिकाणी मोफत सीसीटीव्ही लावून देण्याची तयारी दर्शवली असतानाही महापालिका सीसीटीव्ही लावण्यास तयार नाही. सीसीटीव्ही लावल्यास नालेसफाईमधील भ्रष्टाचार उघड होईल अशी भीती अधिकाऱ्यांना असल्याचे आरटीआय कार्यकर्ते जाहिद शेख यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या एसडब्लूडी (पर्जन्य जल वाहिन्या) विभागाकडून सन २०१४ मध्ये १६८ व १८२ या निविदेमधून रफी नगर, बैंगणवाडी, बाप हेरिटेज, ज्ञानसाधना हायस्कुल नाल्याच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कंत्राट आर. ई. इन्फ्रा.ला देण्यात आले. नाल्याचे काम करण्यासाठी नाल्याचे पाणी अडवणे गरजेचे होते. यासाठी महापालिकेची सी अँड डीची परवानगी न घेता मुंबईमधील बिल्डरांच्या कामाच्या ठिकाणच्या मातीचा कचरा, डेब्रिज आर. ई. इन्फ्रा. या कंत्राटदाराने प्रति गाडी २३०० ते २५०० रुपये घेऊन तब्बल १०७०० ट्रिप गाड्या रफी नगर नाल्यात टाकून घेतल्या असल्याचे जाहिद शेख यांनी सांगितले.
महानगरपालिकेकडून सी अँड डी ची परवानगी न घेता बेकायदेशीर मातीचा कचरा, डेब्रिज एखाद्या ठिकाणी टाकल्यास प्रति गाडी २० हजार रुपये दंड घेतला जातो. आर. ई. इन्फ्राने १०७०० गाड्या डेब्रिज आणि माती रफी नगर नाल्यात टाकली. २० हजार रुपये प्रति गाडी प्रमाणे आर.ई. इन्फ्राकडून २१४ कोटी रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केलेला नाही. तसेच पालिकेच्या एम पूर्व विभागातील एसडब्लूएम व एसडब्लूएमच्या विभागीय कार्यालयाला या १०७०० गाड्या खाली करण्यासाठी प्रति ट्रिप ५२५ रुपये शुल्क भरावे लागते. १०७०० गाड्यांसाठी ५२५ रुपयांप्रमाणे ५६ लाख १७ हजार ५०० रुपये इतर शुल्क होते. हे शुल्कही महापालिकेने आर. ई. इंफ्राकडून वसूल केलेले नाही. नाले सफाई घोटाळ्या प्रमाणेच हा सुद्धा एक मोठा घोटाळा असल्याचे जाहिद शेख यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेत नालेसफाईचा घोटाळा झाला असल्याने रफिक नगर नाल्यात १०७०० ट्रक टाकण्यात आलेली मातीचे व या ठिकाणावरून जो गाळ इतरत्र नेवून टाकला जात आहे त्याची माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे या ठिकाणची माती आणि डेब्रिज कोणत्या गाड्यांमधून नेले जात आहे, मुंबई बाहेर ज्या ज्या ठिकाणी गाळ टाकला त्या ठिकाणी नक्की गाळच टाकला जात आहे का याची शहानिशा करण्यासाठी सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. या सीसीटीव्हीमधून गाड्या किती आल्या त्याचबरोबर नाल्यातील गाळ टाकला जात आहे कि माती आणि डेब्रिज आणून टाकले जात आहे याची माहिती महापालिकेला मिळू शकते. यमाउळें पालिकेने त्वरित नाले सफाईच्या ठिकाणी व गाळ खाली केला जात आहे अश्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी जाहिद शेख यांनी केली आहे.