मुंबई / प्रतिनिधी - गोवंडी शिवाजी नगर मधील रफीक नगर, दुर्गा सेवा संघ बाप हेरिटेज या विभागाला पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होत नव्हता. नागरीकांना पाणी माफियाकडून पाणी विकत घ्यावे लागत होते. मात्र आता या विभागात महापालिकेकडून पाण्याची पाईपलाइन नव्याने टाकली जाणार असल्याने या विभागात पाणी पुरवठा सुरळीत होउन नागरिकांना पाणी माफिया कडून पाणी घेण्याची गरज भासणार नाही असे सलमा खातून यांनी सांगितले.
मुंबईच्या झोपडपट्टी विभागात अनेक ठिकाणी पाणी चोरी होत असून यामधून अनेक पाणी माफिया तयार झाले आहेत. या पाणी माफियामुळे अनेक वेळा नागरीकांना पुरेसे पाणी मिळत नाही. अशीच परिस्थिती गोवंडीच्या रफ़ीक नगर, दुर्गा सेवा संघ बाप हेरिटेज या ठिकाणी होती. गेले 60 वर्षे योग्य प्रमाणात पाणी मिळत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले होते.
रफ़ीक नगर, दुर्गा सेवा संघ बाप हेरिटेज या ठिकाणी पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने भारतीय आवाम एक्टिव्हिस्ट पार्टीच्या राष्ट्रिय अध्यक्षा सलमा खातून यांनी महापालिकेच्या एम पूर्व विभागाकड़े सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे अनेक वेळा राजकीय पुढारी आणि पाणी माफिया कडून धमक्या देण्यात आल्याचे खातून यांनी सांगितले,
तरीही या धमक्याना भिक न घालता पाठपुरावा चालु ठेवल्याने एम पूर्व पाणी पुरवठा विभागाने रफीक नगर, दुर्गा सेवा संघ बाप हेरिटेज या ठिकाणी नवी पाईप लाइन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका नवी पाईप लाइन टाकणार असल्याने येथील 5 हजार नागरिकांना याचा फायदा होणार असून येथील पाणी चोरीचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात कमी होईल असे सलमा खातून यांनी सांगितले.