नंदुरबार, दि. 17 : ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून सातपुडयातील कुपोषणावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार डॉ. विजयकुमार गावित, के. सी. पाडवी, उदेसिंग पाडवी, चंद्रकांत रघुवंशी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, पोषण पुनर्वसन केंद्रांत (एनआरसी) कुपोषित बालकांवर 15 दिवस उपचार केल्यानंतर बाळाच्या औषधोपचारांवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टिम विकसित करावी. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पोषण आहार योजनेंतर्गत गरोदर माता व स्तनदा मातांना आहार वेळेत पोहोचेल यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात चांगले काम झाले आहे. तसेच ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले आहे. त्याचबरोबर अजूनही शेततळ्यांसाठी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यानुसार जेथे जागा उपलब्ध असेल, तेथे शेततळ्यांना मंजुरी देण्यात यावी. त्यासाठी लागणारा वाढीव निधी शासन तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचबरोबर जिल्ह्यात अटल सोलर कृषीपंपाचे उद्दिष्ट 200 पर्यंत वाढवून त्यासाठी देखील निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात जून महिन्यापर्यंत अधिकाधिक शौचालय उभारण्यात यावेत. तसेच मार्च 2018 पर्यंत जिल्ह्यातील सर्व महसुली गावे विजेने जोडण्यात यावीत. या कामामध्ये वन विभागाची काही अडचण असल्यास ती तातडीने दूर करावी. विजेचा तुटवडा भासल्यास मध्यप्रदेश सरकारशी बोलून त्याचेकडून वीज उपलब्ध करून घेण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडण्या तातडीने देण्यात याव्यात. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात शौचालयांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती हागणदारीमुक्त कराव्यात. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) धडगाव नगरपंचायत लवकरात लवकर हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजनेंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.
स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी अक्कलकुवा, धडगाव या तालुक्यात मोठया प्रमाणात उत्पादित होणाऱ्या आंब्यावर प्रक्रिया करुन आमचुराचा ब्रँड तयार करण्यात यावा. जेणेकरुन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे करताना गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. जिल्ह्यात आतापर्यंत 48 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप झाले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकां मार्फत भांडवल उपलब्ध करुन ते जिल्हा बँकेच्या यंत्रणेमार्फत वाटप करण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात गाळ मुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत अधिकाधिक कामे होतील, असे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा तालुकानिहाय व योजनानिहाय आढावा घेतला.
जलयुक्त शिवारच्या कामांना भेट -मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगदरी, ता. अक्कलकुवा येथे सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियान आणि इंदिरा आवास योजने अंतर्गतच्या कामांना भेट दिली. इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाची पाहणी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. या योजनेचे लाभार्थी पोहऱ्या वळवी यांचेकडून घर बांधणीसाठी मिळणारे अनुदान आणि घरात शौचालय बांधण्याबाबत चर्चा केली.
फडणवीस यांनी अमृत पाडवी यांच्या घराला भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी पाडवी कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे पारंपरिक पध्दतीने तीरकमान आणि शिबली (फुलांचा गुच्छ असलेली टोपली) देऊन आदिवासींच्या पारंपरिक नृत्याने स्वागत केले. याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे हस्ते डोंगरी विकास योजनेंतर्गत मोलगी येथे बांधण्यात आलेल्या सभागृहाचेही उद्घाटन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत भगदरी ते चिकपाणी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.