महापालिका व पोलिसांचे दुर्लक्ष - रहिवाश्यांमध्ये संतापाची लाट
मुंबई / प्रतिनिधी -गोवंडी येथील रफिक नगर नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण व संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. या कामाच्या ठिकाणी मशिनीच्या माध्यमातून फायलिंगचे काम सुरु असताना नाल्याच्या बाजूला असलेल्या घरांना हादरे बसून तडे गेले आहेत. यामुळे याठिकाणी घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली असताना महापालिका आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने रहिवाश्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुंबई महानगरपालिकेने गोवंडी रफिक नगर नाल्याच्या रुंदीकरण, खोलीकरण व संरक्षण भिंत बांधण्याचे काम सन २०१४ मध्ये आर. ई. इन्फ्रा. या कंत्राटदाराला दिले आहे. रफिक नगर नाल्याचे काम देऊन दोन ते तीन वर्षे झाली तरी कंत्राटदाराचे काम संथ गतीने सुरु आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जाहिद शेख यांनी माहिती अधिकारात मिळवलेला कागादपत्रावरून कंत्राटदाराने कागदपत्रे, बँक ग्यारेंटी न भरताच कंत्राट मिळवल्याचे समोर आले आहे. नाल्यात मुंबईमधील बिल्डरांकडून माती आणि रॅबिट टाकून पैसे कमावला असताना आता हीच माती नाले सफाईचा गाळ म्हणून नाले सफाईचा कंत्राटदारांना विकला जात आहे. यामधून कंत्राटदार महापालिकेची करोडो रुपयांची फसवणूक करत असल्याचे जाहिद शेख यांनी सांगितले.
याच कंत्राटदाराचे सध्या रफिक नगर नाल्यामध्ये फायलिंगचे काम सुरु आहे. या कामामुळे येथील जमिनीला हादरे बसत असून अनेक घरांना तडे गेले आहेत, अनेक घरे मोडकळीस आली आहेत. असेच हादरे बसत राहिल्यास या विभागातील अनेक घरे कोसळून वित्त व जीवित हानी होण्याची शक्यता आहे. यामुळे येथील रहिवाश्यांच्या मुंबई महानगर पालिकेच्या आपातकालीन विभागाकडे ४ मे २०१७ रोजी तक्रार (क्रमांक ३५०) केली. अश्याच अनेक तक्रारी पालिकेच्या एम पूर्व विभागात तसेच स्थानीकी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या. मात्र कंत्राटदाराच्या पुढे महापालिका व पोलीस प्रशासन रहिवाश्यांचे ऐकत नाहीत अशी येथील रहिवाश्यांनी तक्रार आहे.
मुंबई महानगरपालिका व पोलीस कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत. कंत्राटदाराच्या कामामुळे येथील रहिवाश्यांची घरे कधीही कोसळू शकतात. रहिवाश्यांची घरे कोसळून एखादा अपघात झाल्यावर पालिका आणि पोलीस प्रशासन दखल घेणार आहे का ? अपघात होण्या आधी पालिका आणि पोलीस काही करणार आहेत का ? असे प्रश्न येतील रहिवाश्यांकडून विचारले जात आहेत. तसेच या ठिकाणी एखादा अपघात झाल्यास याला कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या महापालिका व पोलीस प्रशासनाला जबाबदार धरावे असे रहिवाश्यांकडून सांगण्यात आले आहे.