मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईच्या कामगार चळवळीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमीत्त त्यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या जीवन प्रवासाचा इतिहास कथन करणाऱ्या 'गुलाबपुष्प' या स्मृती ग्रंथाचे लोकार्पण २१ मे रोजी होणार असल्याची माहिती कॉ. गुलाबराव गणाचार्य स्मारक व धर्मादाय विश्वस्त संस्थेचे विश्वस्थ सुनील गणाचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत विजय गणाचार्य, अनिल गणाचार्य सोबत होते.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना २१ मे रोजी सकाळी १० वाजता हा लोकार्पण कार्यक्रम दादर शिवाजी पार्क येथील स्वतंत्रवीर सावरकर सभागृह येथे होणार असून या सोहळ्याला माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य, आमदार जयंत पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार आशिष शेलार, भाकपचे भालचंद्र कांगो, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, रिपाईचे अविनाश महातेकर, जेष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित राहणार असल्याचे गणाचार्य यांनी सांगितले.
गुलाबराव गणाचार्य यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडीज या संस्थेला १ लाख ११ हजार ११ इतकी रक्कम देणगी दिली जाणार असून याच्या व्याजामधून चांगल्या गुणांनी पस होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीधर विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पात्र व्यक्तीस ११ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. कामगारांची बाजू मांडणाऱ्या वकिलास ११ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. आर्थररोड येथील येथील गणाचार्य चौकात कामगारांच्या स्मृती जातं करणाऱ्या शिल्पाची उभारणी केली जाणार आहे. गिरणगावातुन जाणाऱ्या मोनोच्या खांबांवर कामगार लढ्याचा इतिहास चितारला जाणार आहे असे गणाचार्य यांनी सांगितले.
तसेच मुंबई हि कामगारांची आणि गिरणी कामगारांची असल्याने नव्या विकास आराखड्यात गिरणी कामगार आणि कामगारांचे, कष्टकऱ्यांचे स्थान काय असेल यावर ऑगस्ट महिन्यात एका विशेष परिसंवादाचे आयोज करण्यात येणार आहे. या परिसंवाद महापौर, महापालिका आयुक्त, एमएमआरडीएचे अधिकारी, आभासु लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर कार्यक्रम होणार असून याची सांगता पुढील वर्षी २१ मे रोजी होईल असे गणाचार्य यांनी सांगितले.