पाकिस्तानकडून दररोजच शस्त्रसंधीचे उल्लंघन - दर दुसर्‍या दिवशी अतिरेकी हल्ल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2017

पाकिस्तानकडून दररोजच शस्त्रसंधीचे उल्लंघन - दर दुसर्‍या दिवशी अतिरेकी हल्ल्या

नवी दिल्ली - पाकिस्तानी सैनिकांनी मागील २ वर्षांत जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवर जवळपास दररोजच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असल्याची गंभीर बाब माहिती अधिकारांतर्गत उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे मागील ५ वर्षांत काश्मीर खोर्‍यात दर दुसर्‍या दिवशी अतिरेकी हल्ल्या झाला असून त्याला भारतीय सैनिकांना सामना करावा लागला आहे. 


'आरटीआय'अंतर्गत गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, '२0१५ साली नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ४0५, तर २0१६ मध्ये तब्बल ४४९ घटना घडल्या. या वर्षांत अनुक्रमे १0 व १३ सुरक्षा जवानांचा बळी गेला. २0१२ ते २0१६ या ५ वर्षांत झालेल्या १,१४२ अतिरेकी हल्ल्यांतही २३६ जवान शहीद झाले, तर ९0 नागरिकांचा बळी गेला. सोबतच ५0७ अतिरेकीही यमसदनी पोहोचले.' '२0१२ मध्ये खोर्‍यात २२0 अतिरेकी हल्ले झाले. त्यात १५ जवानांसह १५ नागरिक मृत्युमुखी पडले. जवानांनी याच वर्षी एकूण ७२ अतिरेक्यांना कंठस्नान घातले. तद्नंतर २0१३ मधील १७0 अतिरेकी हल्ल्यांत १५ नागरिक ठार, ५३ जवान शहीद आणि ६७ अतिरेकी ठार झाले. २0१४ सालीही खोर्‍यात २२२ अतिरेकी हल्ले झाले. त्यात ४७ जवान शहीद, २८ नागरिक ठार तर चकमकीत ११0 अतिरेकी मारले गेले. २0१५ साली झालेल्या २0८ अतिरेकी हल्ल्यांत १७ नागरिकांसह ३९ सुरक्षा जवान ठार, तर १0८ अतिरेकी मारले गेले,' असे गृहमंत्रालयाने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. २0१६ मध्येही खोर्‍यात अतिरेकी हिंसाचाराच्या ३२२ घटना घडल्या. त्यात ८२ सुरक्षा कर्मचारी शहीद, तर १५ नागरिक मृत्युमुखी पडले. गतवर्षी तब्बल १५0 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले. सुरक्षा तज्ज्ञ लेफ्टनंट जनरल राज कादयान यांनीही खोर्‍यातील शस्त्रसंधी उल्लंघनाच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. 'पाक लष्कराला तेथील राजकीय नेतृत्वाला आपल्या मुठीत ठेवायचे आहे. त्यामुळेच खोर्‍यात असे घडत आहे. पाक आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीरला मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करत आहे,' असे कादयान यांनी सांगितले.

'पाकने भारताविरोधात छुपे युद्ध छेडले आहे. पाक शांततेची भाषा करतो. मात्र, शांतता त्याच्या हृदयात नाही. जम्मू-काश्मीर याचे उदाहरण आहे,' 'सद्य:स्थितीत खोर्‍यात एक नवी पद्धत सुरू झाली आहे. लष्कराने एखाद्या भागात अतिरेक्यांना घेरले, तर सोशल माध्यमांच्या मदतीने तिथे नागरिकांना गोळा केले जाते. यामुळे सुरक्षा दलांना अभियान राबवणे अवघड होत आहे,' असे ते म्हणाले.
- जी.डी. बक्षी - मेजर जनरल (सेवानिवृत्त) सुरक्षा विश्लेषक  

Post Bottom Ad