जलयुक्तच्या सर्वात मोठ्या जलक्रांतीसाठी प्रशासकीय यंत्रणेने जीव ओतून काम करावे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2017

जलयुक्तच्या सर्वात मोठ्या जलक्रांतीसाठी प्रशासकीय यंत्रणेने जीव ओतून काम करावे


नागपूर, दि. 5 : जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात जनतेमध्ये प्रचंड उत्साह असून लोकसहभागही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. या उपक्रमामध्ये प्रशासकीय यंत्रणेने जीव ओतून काम केल्यास सर्वात मोठी जलक्रांती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आर्वी येथे पंचायत समितीच्या सभागृहात वर्धा जिल्ह्यातील जलयुक्त शिवारसह विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री अमर काळे, समीर कुणावर, डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री घरकुल योजना, खरीप पीक कर्ज वाटप, स्वच्छ भारत अभियान, लोअर वर्धा प्रकल्पाचे पुनर्वसन यासह विविध योजनांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वर्धा जिल्ह्याने जलयुक्त योजनेमध्ये उल्लेखनीय काम केले असून येत्या एक महिन्यात अपूर्ण कामे पूर्ण करावीत. स्वच्छ भारत अभियानामध्ये संपूर्ण जिल्हा येत्या तीन महिन्यात हागणदारीमुक्त होईल या दृष्टीने अंमलबजावणी करावी. 90 टक्क्यांपेक्षा जास्त हागणदारीमुक्त झालेल्या गावांना प्राधान्य देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खते, बियाणे यासह सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल यादृष्टीने नागपूर मॉडेल प्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बचत गटासाठी तालुकास्तरावर मॉल तयार करावे तसेच सर्व नगरपरिषदांनी शेतकऱ्यांना उत्पादित माल विकता यावा यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. भाजीपाला विक्रीसाठी शासकीय कार्यालय परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

वर्धा मेगा फूड पार्क संदर्भात आढावा घेताना या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन वीज, पाणी व रस्ता यासंदर्भातील आवश्यक कामे व मंजुरी एक महिन्यात द्यावी, असे फडणवीस यांनी सांगितले. हा प्रकल्प येथील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलविणारा ठरणार आहे. राष्ट्रीय दूध विकास प्राधिकरण वर्ध्यासह अमरावती येथे दूध उत्पादनाच्या वाढीसाठी विशेष प्रकल्प राबवित असून जिल्ह्यातील 140 गावात दूध संकलनाचे काम करीत आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दुधाचा जास्त दर मिळत असून शेतकऱ्यांनीही दूध उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावे. विदर्भ व मराठवाड्यातील गावांमध्ये एनडीडीबी चांगले काम करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

निम्न वर्धा प्रकल्पाच्या पुनर्वसनासंदर्भात आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबाना आपले गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी आल्यामुळे आपलेपणाची भावना निर्माण होईल अशाच पद्धतीने पुनर्वसन करावे. यासाठी आदर्श असे मॉडेल तयार करावे. शासनाच्या विविध योजना एकत्रित राबविताना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा निधी जास्तीत जास्त कसा उपयोगात आणता येईल, यासाठी प्रयत्न करावे.

वर्धा जिल्ह्याने राबविलेली आपली योजना, वर्धिनीसोबत पूरक वर्धा उपक्रम, लॅंड बँक संकल्पना, चारायुक्त शिवार आदी नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बैठकीत सादर केली. वर्धा ड्रायपोर्ट, सेवाग्राम विकास आराखडा, मागेल त्याला शेततळे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदी उपक्रमांचा आढावा घेताना अंमलबजावणीमध्ये जे तालुके मागे आहेत त्यांनी कामाची गती वाढवावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

जलयुक्त साठी दोन लक्ष रुपयेआर्वी तालुक्यातील सहकारी कुक्कुटपालन संस्थेला राज्यस्तरीय सहकारी संस्थेचा पहिला एक लक्ष रुपयांचा पुरस्कार तसेच संस्थेचे एक लक्ष रुपये असे एकूण दोन लक्ष रुपयांचा धनादेश शासनाच्या जलयुक्त शिवार उपक्रमासाठी राहुल ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. प्रारंभी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बचतगटातर्फे उत्पादित वस्तूंची परडी मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिली.

Post Bottom Ad