मुंबई, दि. 5 : जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून ‘रुबेला मिजल (गोवर) मुक्त महाराष्ट्र’ अभियान फेब्रुवारी 2018 पासून राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 9 महिने ते 15 वर्षांच्या मुला-मुलींना लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली.
मंत्रालयात जागतिक आरोग्य संघटनेचे भारताचे प्रतिनिधी हँक बॅकेडम यांनी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली. यावेळी राज्याच्या आरोग्याच्या विविध बाबींविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. प्रदिप व्यास उपस्थित होते.
जागतिक आरोग्य संघटनेने विविध आजारांवरील लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. त्याअंतर्गत पुढील वर्षांपासून महाराष्ट्रात गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे बॅकेडम यांनी यावेळी सांगितले.
राज्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जागतिक आरोग्य संघटनेच्या बॅकेडम यांनी कौतुक केले. या अभिनव योजनेच्या माध्यमातून उपचाराबरोबर मोफत शस्त्रक्रिया केली जात असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होत असल्याचे बॅकेडम यांनी सांगितले.
यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, राज्यात स्वाईन फ्ल्यूचा काही भागात प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यावर उपाययोजना आणि उपचारासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न केले जात आहे. जाणीवजागृतीबरोबरच राज्यभर सर्व्हेक्षण मोहिम हाती घेम्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या महापालिका क्षेत्रामध्ये स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळून येतात त्या महापालिका आयुक्तांशी आरोग्यमंत्री सातत्याने संपर्कात राहून मार्गदर्शन केले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भातील लसीकरण आणि प्रभावी औषधांचा वापर या विषयी मार्गदर्शन करावे. स्वाईन फ्लुवर पुढील वर्षी नवी लस आणण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने तयारी केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राज्यात पोलीओ लसीकरण मोहिमेवर विशेष लक्ष देण्यात आले असून मालेगाव व भिवंडी शहरांमध्ये लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यात यश आले आहे. मात्र निमशहरी भागात लसीकरणाच्या दरम्यान अडचणी येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी भागामध्ये शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घ्यावा. राज्यातील 15 आदिवासी जिल्ह्यांमध्ये बालकांना लसीकरणाची मोहिम हाती घ्यावी व तिचे संनियंत्रण जागतिक आरोग्य संघटनेने करावे. लसीकरण मोहिम अधिक प्रभावी होण्यासाठी व त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळावी याकरिता सॉफ्टवेअर किंवा ॲप विकसित करावे त्यामुळे लसीकरणाची आकडेवारी बिनचुक ठेवण्याबरोबरच लसीकरणातून कुठलेही बालक सुटू शकणार नाही. राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्हे मलेरियामुक्त झाले असून गडचिरोलीमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या भागातही लसीकरण मोहिम आणि संशोधन हाती घ्यावे. राज्यात अन्य आजारांबरोबरच विल्सन डिसीजचे रुग्ण आढळून येतात. महाराष्ट्रासाठी यासंदर्भात विशेष प्रयत्न करावेत. अशी आग्रही मागणी आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.