कंत्राटदारांच्या कामगिरीचा इतिहास आता 'सिंगल क्लिक'वर उपलब्ध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2017

कंत्राटदारांच्या कामगिरीचा इतिहास आता 'सिंगल क्लिक'वर उपलब्ध

मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेची विविध नागरी सेवा सुविधा विषयक कार्ये निविदा पद्धतीने कंत्राटदारांकडून करवून घेतली जातात. यानुसार कंत्राटदारांनी केलेल्या कामांच्या गुणवत्तेचा अहवाल संबंधित खात्यामार्फत वेळोवेळी तयार केला जात असतो. मात्र आता हा अहवाल त्या-त्या खात्याच्या स्तरावरच जतन केला जात असल्याने कंत्राटदाराने एका खात्यात केलेल्या कामांच्या गुणवत्तेची माहिती इतर खात्यांना होत नव्हती. यामुळे एखाद्या खात्याचे काम निकृष्ट दर्जाचे करुनही सदर कंत्राटदाराला दुस-या खात्याचे काम दिले जाण्याची शक्यता असायची. कंत्राटदार माहिती व निविदा प्रक्रियेतील ही उणीव लक्षात घेऊन सर्व कंत्राटदारांच्या कामांचे अहवाल त्यांच्या 'युआयडी' क्रमांकाशी संगणकीय प्रणालीमध्ये (ERP / SAP) जोडण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे ही माहिती अद्ययावत (Upload) झाल्याशिवाय कंत्राटदाराला त्याचे देयक मिळणार नाही, अशीही तरतूद यात करण्यात आली आहे.


कंत्राटदारांच्या कामांविषयीचे गुणवत्ता अहवाल कंत्राटदारांच्या 'युआयडी' क्रमांकाला ३१ मे २०१७ पासून संगणकीय पद्धतीने जोडले जाणार आहेत. महापालिकेच्या अंतर्गत संगणकीय प्रणालीमध्ये (ERP / SAP) प्रत्येक कंत्राटदाराच्या 'युआयडी'ला (Vendor Code) आतापर्यंत केवळ कामाचा आदेश क्रमांक (PO Number) आणि कंत्राट-कामाचे मूल्य एवढीच माहिती उपलब्ध असायची. त्याचबरोबर कंत्राटदारांद्वारे केल्या जाणा-या कामांचा गुणवत्ता अहवाल हा यापूर्वी केवळ संबंधित खात्याच्या / विभागाच्या स्तरावरच जतन केला जात असे. यामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामांच्या गुणवत्तेचा अहवाल इतर खात्यांना सहजपणे उपलब्ध होत नसे. तसेच असा अहवाल उपलब्ध करुन घ्यावयाचा झाल्यास यात मोठ्या प्रमाणात कालापव्यय होत असे. आता कंत्राटदारांची व संबंधित कामांची माहिती संगणकीय पद्धतीने अंतर्गत स्तरावर उपलब्ध करुन देण्याबाबत आमूलाग्र सुधारणा ३१ मे २०१७ पासून लागू करावयाचे आदेश महापालिका आयुक्तांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

या सुधारणांमध्ये प्रत्येक कंत्राटदाराद्वारे करण्यात येणा-या कामांची माहिती कंत्राटदाराच्या युआयडीला जोडण्यात येणार आहेत. यामध्ये कामाविषयीची संख्यात्मक व गुणात्मक माहिती (Quantitative and Qualitative Info.) याचा समावेश असणार आहे. संख्यात्मक व गुणात्मक माहिती मध्ये प्रामुख्याने कंत्राटदाराची नोंदणी विषयक माहिती, कंत्राटाची कामांनुसार रक्कम, कामांच्या प्रगतीचा अहवाल, कामांचा गुणवत्ता अहवाल, अदा करण्यात आलेल्या रकमेची माहिती, दंड झाला असल्यास त्याविषयीची माहिती, कामचुकारपणा झाल्याबाबत किंवा निकृष्ट दर्जाच्या कामाची माहिती, कंत्राटदाराचा काळा यादीत समावेश झाला असल्यास त्याबाबतची माहिती इत्यादी माहिती उपलब्ध असणार आहे.

Post Bottom Ad