मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) – मी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पाईक आहे. माझ्यासाठी छत्रपतींचे कुळ हे महत्त्वाचे आहे. बहुजनांचे, शेतक-यांचे, कामगारांचे प्रश्न सोडविणे या एकाच विचाराने राष्ट्रपती नियुक्त खासदारकीचा मी स्वीकार केला आहे. जातीधर्मातील तेढ बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी समाज प्रबोधन झाले पाहिजे, असे विचार असलेल्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन, 6 जून हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हायला हवा, अशी मागणी युवराज छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली. महाराष्ट्र राज्य छावा क्रांतीवीर सेनेचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन नुकताच संपन्न झाले. त्यावेळी छत्रपती खा. संभाजीराजे बोलत होते.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाचे अनेक प्रश्न आहेत. बहुतांश मराठा समाज हा शेती करतो. आज शेतक-यांचे अनेक समस्या आहेत. या समस्यांवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता ताराराणी, धर्मवीर संभाजीराजे भोसले यांनी महान कार्य आपल्या कार्यकाळात केले आहे. बहुजन समाजाला जो न्याय दिला. अशाच पध्दतीचे कार्य येथून पुढे आपल्याकडून व्हावे, अशी इच्छा होती. महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या घराण्याला जो आदर दिला जातो. हे मी पहात होतो. केंद्र सरकारने शाहू महाराजांच्या घराण्याचा सन्मान करण्याची इच्छा प्रकट केली. म्हणून माझी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नेमणूक करण्यात आली. समाजकार्य करण्यासाठी मी राजवाडा सोडून बहुजनांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला असे संभाजीराजे म्हणाले.
खासदार झाल्यानंतर पहिल्या भाषणातच मी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, यासाठी संसदेत सर्वात प्रथम आवाज उठवला. भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेले हे गडकोट महाराष्ट्र सरकारकडे संवर्धनासाठी हस्तांतरीत करावेत यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश आले. रायगडासाठी आता पर्यंत फक्त 1 कोटी 30 लाख खर्च झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून नुकताच 660 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. त्यातून येत्या तीन वर्षात रायगडाचे संवर्धन केले जाणार आहे. यामध्ये शिवभक्तांनी श्रमदानाचे योगदान देऊन सहभाग घ्यावा. तसेच सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा, शिवनेरी हे पाच किल्ले 'मॉडेल फोर्ट' म्हणून विकास करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भविष्यात येणा-या पिढीला छत्रपतींच्या कार्याची माहिती होईल असे संभाजी राजे यांनी सांगितले.
तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी 9 ऑगस्टला मुंबईत निघणा-या मराठा मोर्चात मी सहभागी होणार आहे. मराठा आरक्षणासाठी आयुष्यात पहिल्यांदाच दिल्लीत मी गांधी टोपी घालून संसदेत सर्वात प्रथम आवाज उठवला. महाराष्ट्रातील इतर खासदार मात्र नुसतेच बोलबच्चन असल्याची टीका देखील छ. संभाजीराजे यांनी केली. नगर जिल्ह्यातील कोपर्डीत घडलेली घटना अत्यंत घ्रृणास्पद आहे. या घटनेचीही आपण संसदेत निंदा केली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीलाच देशभर साजरी केली जावी. पुढील वर्षातील शिवजयंती पंतप्रधानांच्या उपस्थितीत मी दिल्लीत साजरी करणार आहे, तसेच राज्यातील सर्व शेतक-यांचे कर्ज व वीज बील माफ करून सातबारा कोरा करावा, मराठा आरक्षण जाहीर करावे आणि थोर व्यक्तिंचा सोशल मीडियामध्ये होत असलेला अपप्रचार थांबवण्यासाठी कठोर कायदा केला जावा, याबाबतही आपण पाठपुरावा करत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर प्रास्ताविकात म्हणाले की, शेतक-यांना देशोधडीस लावणा-या पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला व समृध्दी महामार्गाला आमचा विरोध आहे. तसेच 1 जूनपासून शेतक-यांनी पुकारलेल्या बंदला छावाचा पाठिंबा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी ढोल वाजविणा-यांना लाज वाटली पाहिजे. शेतक-यांच्या प्रश्नावर आणि मराठा आरक्षणाबाबत बोटचेपे धोरण घेणा-या सरकारला येथून पुढच्या काळात छावा स्वस्थ बसू देणार नाही. तसेच छावाचे पुढील महाआधिवेशन मराठवाड्यात घेण्यात येईल, असे गायकर यांनी जाहीर केले.
या अधिवेशनात शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचे कर्ज व वीज बील माफ करून 7/12 कोरा करावा. मराठा आरक्षण त्वरीत जाहिर करावे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करून पिडीत शेतक-यांना न्याय मिळावा. शेतक-यांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण व वसतीगृह निर्माण करावे. महिला सबलीकरण व संरक्षण कायदा अंमलात आणावा. सर्व थोर महापुरुषांची अवहेलना थांबवावी व गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करावे. के.बी.सी. गुंतवणुकदारांचे पैसे लवकरात लवकर परत करावे. स्त्री भ्रूण हत्या थांबवावी यासाठी कडक धोरण आखावे. देशभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करण्यात यावी याबाबत आदेश काढावेत. महापुरुषांच्या नावाने अंमली पदार्थांची विक्री, उत्पादन, बिअर बार, दारू विक्रीची दुकाने व फटाक्यांवरील नावे आदींवर बंदी आणण्यासाठी कठोर कायदा तयार करावा. वारकरी सांप्रदायातील किर्तनकार, मृदूंगाचार्य, गायनाचार्य, भजनी मंडळ आदींना मासिक मानधन विनाअट द्यावे. शहिद जवान व आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी जय जवान, जय किसान योजना राबवावी हे ठराव मंजुर करण्यात आले.
यावेळी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत राणे, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, प्रदेश सरचिटणीस दिनकर कोतकर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष शिवाभाऊ तेलंग, प्रदेश संघटक नितीन दातीर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल गव्हाणे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रकाश पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष राम घायतिडक पाटील, पुणे शहराध्यक्ष आरिफ सुभान शेख पुणे जिल्हा महिलाध्यक्षा अनिता पैठणपगार, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सागर भोसले, विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष राजू फाले, संघटनेचे 28 जिल्ह्यांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.