मुंबई (प्रतिनिधी ) -उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे झालेल्या दलित अत्याचाराच्या निषेधार्थ आज आझाद मैदान येथे तीव्र निदर्शने करण्यात आली . विविध सामाजिक संघटनासह लोकप्रतिनिधीही यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते .उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथील दलित वस्तीवर ठाकूर समाजातील समूहाने जोरदार हल्ला केला होता . या हल्ल्याचा निषेध आज मुंबईत करण्यात आला . संविधान संवर्धन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या निदर्शनात संविधान गौरव बहुजन महामोर्चा ,आंबेडकर ब्रिगेड ,विद्यार्थी संघटना आदी सहभागी झाले होते माजी खासदार प्रा भालचंद्र मुणगेकर ,आ.विद्या चव्हाण ,आरपीआयचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे , अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर ,सुरेश सावंत ,ललित बाबर , युवराज मोहिते , राजू झनके,अशोक कांबळे ,वैशालीताई जगताप आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.
सहारनपुर आणि महाराष्ट्रातील पूर्णा , मोगरगा येथील घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या आहेत . महाराष्ट्रात तसेच उत्तर प्रदेशात नव्यानेच सत्तेत आलेल्या फडणवीस तसेच योगी सरकारचा जातीयवादी प्रवृतींवर वाचक राहिला नसून भाजपच्या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघच देशात उन्माद पसरवत असल्याचा आरोप यावेळी वक्त्यांनी केला . या धार्मिक उन्मादाला आळा घालायचा असेल तर भारतीय संविधानाला मानणाऱ्या प्रत्येक भारतीयांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे या वक्त्यांनी सांगितले . तर सहारनपुर आणि दलित अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संविधान गौरव बहुजन महामोर्चा व आंबेडकर ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने एक निषेध सभा लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली .दलित अत्याचार आणि भाजपा सरकार यावर मुंबईत ठिकठिकाणी बैठका घेण्यात येणार असल्याचेही याप्रसंगी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले . हिरामण खंडागळे , अजित बनसोडे, राजू रोटे. मुमताज शेख आदींनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली .