नालेसफाई कधीच पूर्ण होत नाही - उध्दव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 May 2017

नालेसफाई कधीच पूर्ण होत नाही - उध्दव ठाकरे


मुंबई (प्रतिनिधी)- नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप निवडणुकीच्या वेळी प्रचारात करण्यात आले. परंतु, त्यात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झालेले नाही. केवळ निवडणुकीपुरते आरोप करणाऱ्यांचे आरोप तथ्यहीन असल्याचा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपला लगावला. तसेच नालेसफाई कधीच पूर्ण होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी नालेसफाईच्या पहाणीदौऱ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माहिम कॉलनी, बी.के. सी ब्रीज, वांद्रे पूर्व, एम.टी.एन. एल ब्रीज कुर्ला (पश्चिम), इर्ला नाला, एअरपोर्ट नाला व जोगेश्वर वालभट नाल्याबरोबरच मिठी नदीची पहाणी केली.

याप्रसंगी युवासेना नेते आदित्य ठाकरे, महापौर विश्वानाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, आरोग्य समिती अध्यक्षा रोहीणी कांबळे, पालिका आयुक्त अजोय मेहता, अभियांत्रिकी संचालक लक्ष्मण व्हटकर आदी पालिका अधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी ६० टक्के नालेसफाई अपेक्षित असते. पालिकेने १० एप्रिलपासून सफाई कामाला सुरुवात केली आहे. दरवर्षी नालेसफाईची कामे शंभर टक्के पूर्ण केली जातात, असा दावा केला जातो. मात्र, नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. ती पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतरही सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्द प्रयोग चुकीचा आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी केले. नालेसफाई किती टक्के झाली यापेक्षा पाणी तुंबू नये हे महत्वाचे अाहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची काम पूर्ण होतील, याकडे पालिकेचे लक्ष राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागील अनेक वर्षापासून मी नालेसफाईची पहाणी करत आहे. दरवेळा मला प्रश्नं विचारला जातो की, निवडणुकीच्या तोंडावर नालेसफाईची पाहणी करता का? आता निवडणुका तर होऊन गेल्या आहेत. मी कधीच निवडणुकीपर्वी पाहणी करत नाही, तर माझे कर्तव्य म्हणून पाहणी करतोय. नाल्यांचे रुंदीकरणाबरोबरच नाल्यांची सुधारणा झालेली आहे. या वर्षी ही नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. सफाईची कामे सातत्याने चालू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पावसाच्या पूर्वी जी कामे करायची आहेत ती पूर्ण केली जातील.मात्र आपण या सफाई कामांची पाहणी करतच राहणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.

गेल्या वर्षी पाणी तुंबले नाही. यावेळी कुठे ही पाणी तुंबणार नाही याची दक्षता पालिका घेईल. तसेच पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावण्याच येणार आहेत. त्यामुळे भविष्यात कोठेही पाणी साचणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

Post Bottom Ad