मुंबई - पश्चिम रेल्वेवर चालत्या गाडीवर दगड भिरकावण्याच्या घटनांमध्ये 2017 मध्ये वाढ झाली आहे. याची गंभीर दखल घेतली आहे. या पुढे धावत्या रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी आणि लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक जखमी झाल्यास दगड मारणाऱ्यावर रेल्वे नियमातील जन्मठेपेची शिक्षा करणाऱ्या कायद्यानुसार गुन्हा नोंद केला जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे रुळा शेजारील झोपड्यांमधून किंवा रुळा बाजूला वावर असलेले समाजकंटक धावत्या रेल्वेवर दगड भिरकावतात. मागील काही महिन्यांमध्ये असे अनेक प्रकार घडल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे प्रवासी, मोटरमन, सुरक्षारक्षक किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील लोको पायलट जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. जानेवारी 2017 ते मे 2017 या कालावधीत पश्चिम रेल्वेमार्गावर असे 34 प्रकार घडले आहेत. दगड भिरकावणारा समाजकंटक दोषी ठरल्यास रेल्वे नियमानुसार त्याला प्रसंगी 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते किंवा कारावास होऊ शकतो. या कायद्याची तरतूद रेल्वे कायद्यांंतर्गत आहे. त्यामुळे अशे प्रकार करणाऱ्या समाजकंटकांवर या कायदयानुसार कारवाई करू असा इशारा पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी के. एन. डेव्हिड यांनी दिला आहे.